पुण्यात शरद पवार-ब्राम्हण संघटना बैठक सुरू; बैठकीनंतर होणार पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 05:25 PM2022-05-21T17:25:08+5:302022-05-21T19:15:51+5:30
सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात आज पुण्यात बैठक होत आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत शरद पवार भूमिका घेत नाहीत तोपर्यंत बैठकीला जाणार नाही, अशी भूमिका काही ब्राम्हण संघटनांनी यापूर्वी घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अशा प्रकारची बैठक बोलावलीच नव्हती, उलट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने भेटीची वेळ मागितली होती, असे म्हटले आहे. आता पुण्यात सध्या पवार ब्राम्हण संघटनांशी चर्चा करत आहेत. चर्चेनंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत.
पवारांच्या कोणत्या वक्तव्यांवर ब्राह्मण संघटनांचा आक्षेप?
-पवारांनी समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते असा दावा केला होता.
-दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असाही दावा पवारांचा होता.
शरद पवार शुक्रवारी कार्यक्रमासाठी पुण्यात आले आहेत. आज (शनिवारी) संध्याकाळी ५ वाजता निसर्ग हॉटेल येथे ब्राम्हण संघटनांशी पवार चर्चा करत आहेत.
आपली भेट घ्यायची आहे, असा मेसेज आनंद दवेंनी केल्याचे शरद पवार यांनीच सांगितले आहे. आता दवेच भेटीला नकार देत आहेत. नाराजी असली तरी कोणतेही प्रश्न चर्चेतूनच दूर होऊ शकतात.
- अंकुश काकडे