शरद पवार उद्योजकांचे नेते : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:08 PM2018-06-04T22:08:22+5:302018-06-04T22:08:22+5:30
सरकारबाबत टोकाची भूमिका घ्या, मात्र शेतमालाची नासाडी करु नका असे वक्तव्य पवार यांनी केले आहे.
पुणे : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाही. ते कृषी पुरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांचे नेते असल्याची टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. शेतकरी जो पर्यंत जात पाहून मतदान करतील तोपर्यंत त्यांच्या स्थितीत बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे लक्ष्मण माने, अॅड. विजय मोरे, नवनाथ पडाळकर यावेळी उपस्थित होते. सरकारबाबत टोकाची भूमिका घ्या, मात्र शेतमालाची नासाडी करु नका असे वक्तव्य पवार यांनी केले आहे. त्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत. ते केवळ शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांचे नेते आहेत. शेतकऱ्यांनी अन्नधान्य फेकून दिल्याने त्यांच्या स्थितीत काहीच बदल होणार नाही. त्यांना मोर्चा आणि आंदोलने काढूनही फारसा फरक पडणार नाही. जोपर्यंत शेतकरी जात पाहून मतदान देत राहील, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या देखील थांबणार नाही. त्यामुळे जातीसाठी माती खाणार नाही, हे शेतकऱ्यांनी ठरविले पाहिजे.
अहमदनगर येथील चोंडी येथे झालेल्या घटनेबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, धनगर आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २०१४मध्ये आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याची विचारणा करणाऱ्या व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला हाताशी धरुन हे गुन्हे दाखल केले आहेत. चोंडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तींवर सौम्य स्वरुपाची कारवाई करण्यात आली. तर, धनगर आरक्षणासाठी घोषणाबाजी करणाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. असा दडपशाहीचा प्रकार देशभरात सर्वत्र दिसून येत आहे. खरेतर ही स्थिती अघोषित आणीबाणीसारखीच आहे.
-------------
भिसेंवरील गुन्हा मागे न घेतल्यास आंदोलन
बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांपैकी एकाने पोलिसांना दगड मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुर्वी जातीवादी मनुवाद होता. आता पक्षपाती मनुवाद केला जात असल्याचे यावरुन दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी डॉ. भिसेंवरील गुन्हा मागे घ्यावा असे त्यांना आवाहन करतो. त्यांनी येत्या १० जून पर्यंत गुन्हा मागे न घेतल्यास धनगर समाज सत्ता संपादन समितीच्या नेतृत्वाखाली तालुकानिहाय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.