'उद्धव ठाकरे, एकदा तरी मैदानात उतरा, माझा बारका पैलवान तुम्हाला चीतपट करेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:45 AM2019-04-26T03:45:35+5:302019-04-26T06:52:02+5:30
ज्यांना आयुष्यात मैदानच माहीत नाही. त्यांनी एकदा तरी मैदानात यावे, असे आव्हान माजी केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना आज दिले.
मंचर (जि. पुणे) : शरद पवारांनी लोकसभेचे मैदान सोडले, अशी गमतीची गोष्ट शिवसेनेचे पक्षप्रमुख जाहीर सभांमधून सांगताहेत. ज्यांना आयुष्यात मैदानच माहीत नाही. त्यांनी एकदा तरी मैदानात यावे, असे आव्हान माजी केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना
आज दिले. या रस्त्याला जाण्याचा विचार करू नका, तुमचे ते काम नव्हे. मैदानात आल्यावर माझी गरज भासणार नाही. रेवडीवर कुस्ती खेळणारा माझा बारका-सारका पैलवान तुम्हाला चीतपट करेल, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी कॉँग्रेस, काँग्रेस आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर येथे शरद पवार यांची जाहीर सभा आज झाली.
पवार म्हणाले, १४ वेळा लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवून माझा एकदाही पराभव झालेला नाही. पुढील वर्षी ८० वय होत असून नवीन पिढीला संधी मिळावी. यासाठी कुठेतरी थांबले पाहिजे, अशी भूमिका मी घेतली. मात्र, शरद पवारांनी मैदान सोडले. अशी गमतीची गोष्ट उद्धव ठाकरे जाहीर प्रचार सभांमधून सांगताहेत. ठाकरे यांनी एकदा तरी मैदानात यावे. तुम्हाला पराभूत करण्यासाठी माझी आवश्यकता भासणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे चांगले मित्र होते. त्यांनी संघटना उभी केली. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मला शिव्या घालण्याचे काम करताहेत. शेतकऱ्यांसाठी हे करणार, ते करणार अशा वल्गना केल्या जातात. राज्यात, केंद्रात सत्ता असताना शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवले नाही, असा सवाल त्यांनी केला.
‘नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या’
काँग्रेसच्या राजवटीत विकासाला महत्त्व देत शेतकरी आणि कामगार वर्गाचे हित पाहिले. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून देशाचा विकास करण्यात आला. आता चित्र बदलले आहे. नोटाबंदी हा मोदींनी अविचाराने घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे राज्यातील १५ लाख लोकांची नोकरी गेली. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारादरम्यान तळेगाव दाभाडे येथे केली.