शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:40 AM2021-10-18T10:40:07+5:302021-10-18T10:44:14+5:30
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या टीकेवर बोलताना पाटील म्हणाले, धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. भारतीय जनता पक्षाकडून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्याला केंद्र सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. तसेच देशावर आलेलं भाजपचं संकट परतवून लावावे लागेल असे आवाहन केले होते. त्याला आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, पवार साहेब काय म्हणतात, यामुळे केंद्र सरकारचा पराभव होणार नाही. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं त्यावर केंद्रात सरकार कुणाचं ते ठरेल. सर्वसामान्य माणूस सुखी आहे. साडेचार कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. त्यामुळे पवार साहेबांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या मनात आलं तरंच केंद्र सरकार पडेल.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या टीकेवर बोलताना पाटील म्हणाले, धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत. या यंत्रणेच्या वतीने उत्तर द्यायला मी काही त्यांचा अधिकारी नाही. सरकार पडण्याच्या विषयात सांगायचं तर सरकार पडणार नाही, परंतु सरकार पडणार नाही हे वारंवार का सांगावं लागते हा महत्वाचा मुद्दा आहे.