ज्येष्ठ नेते शरद पवारांचा मदतीचा हात; बारामतीतील कोविड सेंटरला २५ लाखांचे आर्थिक पाठबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 07:50 PM2021-05-28T19:50:07+5:302021-05-28T19:52:05+5:30
कोरोना संकट आल्यापासुनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत.
बारामती : बारामती शहरात कोरोना संकट सावरण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कोविड सेंटरला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मदतीचा हात दिला आहे. पवार यांनी सातव कुटुंबिय व डॉ. सुनील पवार यांनी सुरु केलेल्या धों. आ. सातव कोविड हॉस्पिटलला शरद पवार यांनी आज २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करीत मदत केली आहे.
कोरोना संकट आल्यापासुनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या सुरवातीच्या काळात रेमडेसिव्हर इंजेक्शन कोविड उपचारासाठी रामबाण उपाय ठरले होते.यावेळी पवार यांनी सर्वसामान्य बारामतीकरांसाठी १०० इंजेक्शन मोफत उपलब्ध केले होते.यंदाच्या वर्षी देखील रेमडेसिव्हीरचा तुटवडा सुरु असताना पवार यांनी सुमारे ४५० इंजेक्शन पाठवत कोरोना संकटात बारामतीला मदतीचा हात दिला होता.त्यापाठोपाठ आता थेट २५ लाखांची मदत केली आहे. त्यामुळे कोविडमुक्त बारामतीसाठी या निधीची मदत होणार आहे.
माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी मुंबई येथे शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यावेळी पवार यांना सातव यांनी या उपक्रमाची माहिती घेतली होती.त्यानंतर पवार हे गुरुवारी(दि २७) रात्री येथील गोविंदबाग निवासस्थानी मुक्कामी आले आहेत. त्यांनी सातव यांना बोलावून हा २५ लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव, माळेगावचे संचालक नितीन सातव, नगरसेवक सूरज सातव आदी या प्रसंगी उपस्थित होते.
आजपर्यंत ३०० रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. बारामतीत कोरोनाची स्थिती गंभीर झालेली असताना कोविड सेंटरची मोठी गरज होती.विशेषत ऑक्सिजनच्या बेडची कमतरता भासत होती.या वेळी सातव कुटुंबियांनी व डॉ. पवार यांनी या हॉस्पिटलची उभारणी केली आहे. येथे ३० ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करुन दिले आहेत.तसेच डॉक्टर व नर्सिंग स्टाफ २४ तास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध केली आहे.