भटक्या विमुक्तांसाठी शरद पवार घेणार मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:42+5:302021-07-04T04:07:42+5:30
पुणे : राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्या न्याय्य आहेत. त्यासंबंधी मुंबईत १३ जुलैला मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन या मागण्यांची ...
पुणे : राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्या न्याय्य आहेत. त्यासंबंधी मुंबईत १३ जुलैला मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन या मागण्यांची तड लावण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
पवार यांनी पुण्यात शनिवारी सकाळी भटक्या विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. गणराज्य संघ या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला. लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, ‘गणराज्य’च्या सुषमा अंधारे व अन्य काही संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भटक्या विमुक्तांना ओबीसीमधून बाहेर काढावे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शेड्यूल्ड ट्राईब तयार करावे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांप्रमाणेच भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठीही प्रमुख शहरांमध्ये वसतिगृहे सुरू करावीत, अशा विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्या. वसंतराव नाईक महामंडळाला निधी मंजूर करावा म्हणजे मंडळाचे कामकाज सुरू होईल असेही सांगण्यात आले. यावर पवार यांनी सर्व मागण्या न्याय्य असल्याचे सांगत मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
विमुक्त जमातीतील ‘राजपूत भामटा’ या जातीचे खोटे दाखले घेऊन शासकीय सवलती लाटणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मागासवर्गीय आयोगाने खरे ‘राजपूत भामटा’ कोण याबाबत सरकारकडे सादर केलेला अहवाल स्वीकारून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशीही मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली. कैलास गौड, नारायण भोसले, नारायण जावळीकर, विनायक लष्कर, हरिभाऊ गायकवाड, अनिरुद्ध वाणी, भेरू शिंदे, प्रफुल्ल गायकवाड बैठकीला उपस्थित होते.