शरद पवार यांनी केली सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:05 AM2021-01-24T04:05:34+5:302021-01-24T04:05:34+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस बनविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमध्ये झालेल्या नुकसानीची तसेच घटनास्थळाची राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस बनविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमध्ये झालेल्या नुकसानीची तसेच घटनास्थळाची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभादेखील उपस्थित होत्या.
शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पवार सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. कोरोनावरील लसीमुळे सिरम इन्स्टिट्यूट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. स्वतः पवार यांनीही या इन्स्टिट्यूटमधून स्वतःला बीसीजी लस टोचून घेतली होती. त्यांनी आग लागलेल्या ठिकाणाची सिरमचे आदर पूनावाला आणि अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच आगीची घटना कशी घडली त्याची ही माहिती घेतली. ते शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. वारजे येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते सिरममध्ये दाखल झाले.
यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा यांच्यासह विठ्ठल मणियार, आमदार चेतन तुपे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त कल्याण विधाते आदी उपस्थित होते. या वेळी पवार यांनी इन्स्टिट्यूटमधील आग लागलेल्या इमारतीची पाहणी करीत घटनाक्रमाची माहिती घेतली. या वेळी आदर यांनी त्यांना घटना कशी घडली याची सविस्तर माहिती दिली. आग नेमकी कुठे लागली, आगीचे कारण काय, आग विझविण्यासाठी तत्काळ कोणत्या उपाययोजना राबविल्या गेल्या, मदतकार्य कसे राबविले गेले यासंदर्भातील सविस्तर माहिती घेतल्याचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.