शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 09:13 AM2024-12-09T09:13:06+5:302024-12-09T09:13:48+5:30
शरद पवारांनी कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचे ऐकू नये अन्यथा लोकशाही प्रक्रियेवारील लोकांचा विश्वास उडेल
शिरूर : विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेच्या कौल मान्य करत पराभव स्वीकारावा, कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचे ऐकू नये अन्यथा लोकशाही प्रक्रियेवारील लोकांचा विश्वास उडेल. अशी कार्यवाही किमान शरद पवार साहेबांनी करू नये. शरद पवार हे ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. अशा नेत्यांनी संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो, असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे सुद्रिक, वराळ यांच्या विवाहानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. लग्नसमारंभात आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. यामुळे सगळे पाहत राहिले. त्यांच्या बरोबर आमदार प्रवीण दरेकर व आमदार राम शिंदे उपस्थित होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार हे कार्यकर्ते यांच्या दबावात असतील म्हणून ते असे बोलत आहेत; परंतु त्यांना माहीत आहे की, कारणे जी काही असतील; परंतु परभव झालेला आहे. गेल्या काही वर्षांपासून बबनराव सुद्रिक व त्यांच्या कुटुंबाचे माझे चांगले संबंध आहे. एका वाईट घटनेनंतर त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व जण एकदिलाने राहिलो. त्यामुळे जिव्हाळा निर्माण झाला आहे व त्यांच्या घरातील विवाहानिमित्त त्यांची आमंत्रण आल्यानंतर मी त्यांना विवाहाला नक्की येईल, असे आश्वासन दिले असल्याने मी आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो.
लग्न कोपर्डी घटनेशी संबंधित
आज ज्या लग्नासाठी मुख्यमंत्री टकळी हाजी हद्दीतील निघोज कुंड परिसरात उपस्थित होते. हे लग्न अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतच्या कोपर्डी निर्भया हत्याकांडातील निर्भयाच्या बहिणीचे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्रिक कुटुंबीयांचे त्यावेळी सांत्वन करताना तुमच्या घरातील लग्न कार्यास मी उपस्थित राहील, असे आश्वासन दिले होते. यामुळे आज या लग्नास उस्थित राहत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले आश्वासन पाळले.