Video: शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी - चिंचवड महानगरपालिका मेट्रोने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 11:21 AM2022-01-17T11:21:01+5:302022-01-17T15:04:06+5:30
फुगेवाडी ते संततुकारामनगर असा मेट्रोने प्रवास करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेपर्यंत ते आले आहेत.
पुणे : पुणे मेट्रोचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्याही झाल्या आहेत. कोरोनाच्या सुरुवातीला २०२० मध्ये मेट्रोच्या कामात बराच खंड पडला होता. त्यानंतर जानेवारी २०२१ च्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सहा किमीच्या प्राधान्य मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वी झाली होती. आताच्या नवीन वर्षांत मेट्रोतून सफर करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून पिंपरी - चिंचवडमधील ही मेट्रो धावण्यास सज्ज आहे. पिंपरीतील या फुगेवाडी स्टेशनला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली. फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा मेट्रोने प्रवासही केला आहे.
मागच्या वर्षी झाले होते ९० टक्के काम
शहरातील पुणे महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गाचे ९० टक्के काम मागच्या वर्षी पूर्ण झाले होते. २०२२ च्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो धावणार होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर महामट्रो सुरूवातीला दररोज दैनंदीन पद्धतीने चालवली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी या मार्गावर एकूण पाच स्थानकांचा समावेश आहे. लवकरच नागरिकांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी महानगरपालिका मेट्रोने प्रवास (व्हिडिओ :- अतुल मारवाडी) #punemetro#pimprichinchawadpic.twitter.com/HLZ83RWWDh
— Lokmat (@lokmat) January 17, 2022
पुणे मेट्रोत ३० स्थानकांचा समावेश
पुणे मेट्रोचे दोन कॉरिडॉरमध्ये विभागणी करण्यात आली असून यामध्ये 30 स्थानकांचा समावेश आहे. पुणे मेट्रोची एकूण लांबी 33.1 किमी असून पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या कॉरिडॉर एकची लांबी 17.4 कमी आहे. यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीचा भुयारी मार्ग आहे. तर वानाज ते रामवाडी या कॉरिडॉर दोनची लांबी 15 किमी आहे. आतापर्यंत 65 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांसाठी प्राधान्य विभाग कार्यन्वित करण्यात येणार आहेत. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय हे प्राधान्य विभाग (मार्ग) आहेत.