"शरद पवार म्हणजे सर्वच खेळांचे विद्यापीठ"; 'क्रिडाविश्वाचा आधारस्तंभ' पुस्तकाचे प्रकाशन

By राजू इनामदार | Published: October 20, 2022 03:28 PM2022-10-20T15:28:31+5:302022-10-20T15:35:41+5:30

फक्त मैदानावरील खेळांचेच नाही तर राजकारण, शिक्षण, समाजकारण अशा सर्वच खेळांमधील शरद पवार हे विद्यापीठ आहे असे प्रतिपादन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले...

"Sharad Pawar means university of all sports"; Publication of book 'kridavishwacha adharstambh' | "शरद पवार म्हणजे सर्वच खेळांचे विद्यापीठ"; 'क्रिडाविश्वाचा आधारस्तंभ' पुस्तकाचे प्रकाशन

"शरद पवार म्हणजे सर्वच खेळांचे विद्यापीठ"; 'क्रिडाविश्वाचा आधारस्तंभ' पुस्तकाचे प्रकाशन

Next

पुणे : शरद पवार यांच्यामुळे सर्वच प्रकारच्या खेळांमधील निवृत्त खेळाडूंना सन्मान मिळण्यास सुरूवात झाली. फक्त मैदानावरील खेळांचेच नाही तर राजकारण, शिक्षण, समाजकारण अशा सर्वच खेळांमधील शरद पवार हे विद्यापीठ आहे असे प्रतिपादन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

विजय उर्फ अप्पा रेणूसे व सहकाऱ्यांनी तयार केलेल्या क्रीडाविश्वाचे आधारस्तंभ, शरद पवार या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन गुरूवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते व मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, कब्बडीपटू शांताराम जाधव, रुस्तूमे हिंद काका पवार, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, खोखो पटू शकुंतला खटावकर, श्रीरंग इनामदार, ॲथलेटिक संघटनेचे ॲड. अभय छाजेड, आमदार चेतन तुपे, अंकूश काकडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, खेळांमधील संघटनात्मक काम करावे ते शरद पवार यांनीच. त्यांच्यामुळे अनेक निवृत्त खेळाडूंना निवृत्ती वेतन मिळू लागले. फक्त खेळांमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात पवार यांनी आपल्या संघटनात्मक कौशल्याने त्या खेळाला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्यामुळेच कब्बडी, खो-खो या खेळांना परदेशातही मान मिळाला. खेळाडूची कारकिर्द संपली की त्याला आर्थिक चणचण भासू लागते. तसे होणार नाही याची काळजी पवार यांनी घेतली व आज बहुतेक खेळांच्या संघटना आर्थिक सुस्थितीत आहेत.

माशेलकर यांनीही पवार यांच्या संघटन कौशल्याचे कौतूक केले. चंदू बोर्डे, शांताराम जाधव, अमोल बुचडे, यांचीही यावेळी भाषणे झाली. अप्पा रेणूसे यांनी प्रास्तविक केले. खेळांमध्येही करियर करता येते, त्यामुळेही नोकरी मिळू शकते. खेळाडूंचे आयुष्यही सुखकर होऊ शकते हे समजावे यासाठी ऐश्वर्या स्पोर्टस ॲकडमीच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकाचे संपादक शिवाजी गोरे, पराग पोतदार तसेच गौतम गिल्डा यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला लेझर शो द्वारे पवार यांच्या क्रिडासंघटनांमधील कामाचा आढावा घेण्यात आला. मिलिंद कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. युवराज रेणूसे यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: "Sharad Pawar means university of all sports"; Publication of book 'kridavishwacha adharstambh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.