बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:14 PM2024-04-12T16:14:28+5:302024-04-12T16:17:12+5:30
Baramati Lok Sabha: अनेक दशके राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी त्यांच्या निंबूत या गावी जाऊन भेट घेतली.
Sharad Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत आपली वेगळी राजकीय वाट निवडली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत. कुटुंबातीलच उमेदवार विरोधात असल्याने शरद पवार यांना लेकीच्या विजयासाठी परिश्रम घ्यावे लागत असून पवारांनी बारामतीत बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. अनेक दशके राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी त्यांच्या निंबूत या गावी जाऊन भेट घेतली. संभाजीराव काकडे यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही सांत्वनपर भेट घेतली.
शरद पवार हे बारामतीच्या राजकारण सक्रिय झाल्यानंतर त्यांचा सुरुवातीच्या काळात काकडे कुटुंबाशीच राजकीय संघर्ष झाला होता. काकडे कुटुंबातील सदस्यांनी आतापर्यंत लोकसभेपासून अगदी जिल्हा परिषदांपर्यंत...विविध निवडणुकांमध्ये पवारांना आव्हान दिलं होतं. मात्र २०१८ मध्ये हे राजकीय वैर संपलं आणि पवार यांनी काकडे कुटुंबातील एका व्यक्तीला सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदावर संधी दिली. मात्र शरद पवार काकडे कुटुंबाच्या घरी गेले नव्हते. अखेर आज ५५ वर्षांनंतर पवार यांनी काकडे कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं.
चंद्रराव तावरेंसोबत बंद दाराआड चर्चा
काकडे कुटुंबासह तावरे कुटुंबाचीही पवारांशी राजकीय संघर्ष झाला आहे. आधी शरद पवारांसोबत काम करणारे चंद्रराव तावरे हे अजित पवारांच्या राजकीय एंट्रीनंतर शरद पवारांपासून १९९७ साली दूर झाले. त्यानंतर तावरे यांनी अजित पवारांविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत अपयश आलं होतं. असं असलं तरी बारामती परिसरात तावरे कुटुंबाचंही राजकीय वलंय आहे. अशा स्थितीत आज शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी बंद दाराआड चर्चा झाली.
भेटीविषयी काय म्हणाले चंद्रराव तावरे?
चंद्रराव तावरे आणि शरद पवारांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली असली तरी या चर्चेचा तपशील देणं तावरे यांनी टाळलं आहे. कारण तावरे हे सध्या भाजपमध्ये सक्रिय असून महायुतीच्या उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवार यांचं काम त्यांना करावं लागणारं आहे. "मी वेगळ्या पक्षात आहे, ते वेगळ्या पक्षात आहेत, कशाला आम्हाला मातीत घालता," असं पत्रकारांना उद्देशून चंद्रराव तावरे यांनी म्हटलं आहे.