शरद पवार राष्ट्रीय सहकारी साखर महासंघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:12+5:302021-02-13T04:13:12+5:30
पुणे : “एक लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या देशातील साखर उद्योगाने साखर एके साखर उत्पादन करण्याऐवजी इथेनॉल आणि ...
पुणे : “एक लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या देशातील साखर उद्योगाने साखर एके साखर उत्पादन करण्याऐवजी इथेनॉल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन या नवीन प्रवाहांकडे वळावे,” असे आवाहन ज्येष्ठ नेेते शरद पवार यांनी केले.
पवार यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयास नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. दिली. राज्याचे कामगार व राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी उपाध्यक्ष अमित कोरे, इस्माचे अध्यक्ष नीरज शिरगावकर, गोदावरी बायो रिफायनरीचे अध्यक्ष समीर सोमय्या, बलरामपूर उद्योग समूहाचे प्रमोद पटवारी, बिस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, रेणुका शुगरचे अध्यक्ष रवी गुप्ता, इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वसंतदादा साखर संस्थेचे डॉ. व्ही. एस. पाटील आदी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी महासंघाच्या वाटचालीबाबत यावेळी सादरीकरण केले.
साखर व इथेनॉल उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह या बैठकीत करण्यात आला. या मुद्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्वरित लक्ष वेधण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. प्रेसमड, बगॅस आणि स्पेंटवॉश या त्याज्य उपपदार्थांवर मूल्यवर्धन करून त्याद्वारे कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करणे महत्त्वाचे आहे. वीज, सेंद्रिय खत, स्यूलोसीक बायो-इथेनॉल यांच्या निर्मितीतून जागतिक पातळीवर कार्बन केडिट्स उपलब्ध आहेत. याद्वारे देशातील साखर कारखान्यांना नवे व खात्रीचे अतिरिक्त मिळकतीचे साधन उपलब्ध होणार असल्याची चर्चा या वेळी झाली.