राज्यातील १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे शरद पवार यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:01+5:302021-04-24T04:10:01+5:30
साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठ्यासाठी जलदगतीने कार्यवाही करण्याचे पत्र वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने पवार यांनी साखर कारखान्यांना हे ...
साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठ्यासाठी जलदगतीने कार्यवाही करण्याचे पत्र वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने पवार यांनी साखर कारखान्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. जे कारखाने बंद आहेत त्यांना ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असे सांगण्यात आले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड पेशंटला ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे. सद्य परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहवीजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी. ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे, अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.
सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथॅनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बन डायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. या ठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग ॲबसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरित कार्यवाही करावी.