शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ अन्...; पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगली चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:03 AM2023-08-02T11:03:46+5:302023-08-02T11:04:12+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थीदशेत असताना टिळकांनीच त्यांची  उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची व्यवस्था करून दिल्याचा दाखलाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.  

Sharad Pawar patted Narendra Modi's back A colorful discussion at the award ceremony | शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ अन्...; पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगली चर्चा  

शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ अन्...; पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगली चर्चा  

googlenewsNext

पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व त्यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती. मात्र, पुरस्काराच्या नावाचे गांभीर्य लक्षात घेत बहुतेक नेत्यांनी थेट राजकीय शेरेबाजी टाळली तरीही काही टीका-टिप्पणी झालीच. त्याचे वेगवेगळे अर्थ लावत सभागृहात लगेचच चर्चा, कुजबुज सुरू झाली.

गुजरातमध्येही लोकमान्यांना त्या काळात मान होता. साबरमती तुरुंगात ते चार महिने होते. अहमदाबादमधील त्यांच्या सभेला सरदार वल्लभभाई पटेल उपस्थित होते. पुढे ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी इंग्रजांनी बांधलेल्या राणी व्हिक्टोरिया उद्यानात लोकमान्यांचा पुतळा बसविला. पदाचा राजीनामा देईल; पण पुतळा तिथेच बसवेल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती, असेही मोदींनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थीदशेत असताना टिळकांनीच त्यांची  उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची व्यवस्था करून दिल्याचा दाखलाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.  

अजित पवारांनी काकांना टाळले 
व्यासपीठावर रांगेतील पहिल्याच खुर्चीवर बसलेल्या शरद पवार यांच्याबरोबर राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांदोलन केले; पण त्यांच्याबरोबरच असलेले अजित पवार मात्र शरद पवार यांच्या खुर्चीच्या मागून त्यांना वळसा घालून पुढे गेले. येतानाही त्यांनी तेच केले. त्याची चर्चा सभागृहात रंगली.

‘देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवरायांनीच केला’
शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत शेलकी टिप्पणी केली. अलीकडे भारतीय सैनिकांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला. मात्र, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांनी लाल महालात याच पुण्यात केला होता, याची आठवण पवार यांनी यावेळी आवर्जून करून दिली. 
स्वातंत्र्य लढ्यासाठी वृत्तपत्र हे नवे शस्त्र लोकमान्यांनी तयार केले. वृत्तपत्रावर कोणताही दबाव नसावा, असे लोकमान्यांचे मत होते, असे पवार यांनी सांगितले. 
याआधी लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची नावे पवार यांनी भाषणात घेतली. आता मोदीही याच यादीत आल्याचा आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.

मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीमधून
भाषणाची सुरुवात मोदी यांनी मराठीमधून केली. भाषणात त्यांनी लोकमान्य टिळक यांच्याबरोबरच विष्णूशास्त्री चिपळणूकर, गोपाळ गणेश आगरकर यांची नावे आवर्जून घेतली. अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे, असेही ते म्हणाले.

काका-पुतण्या आणि मोदी
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदी आल्यानंतर शरद पवार यांनी मोदी यांच्या खांद्यावर हाताने हलकेच थोप़टल्यासारखे केले. कार्यक्रम संपल्यावर मोदी यांनी व्यासपीठावरून निघताना अजित पवार यांच्या खांद्यावर हातांनी थोडे थोपटल्यासारखे केले.
 

Web Title: Sharad Pawar patted Narendra Modi's back A colorful discussion at the award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.