चंद्रकांत पाटील म्हणाले, पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:11 PM2021-12-30T17:11:30+5:302021-12-30T17:15:27+5:30
मोदी आणि पवारांचं नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्या इतपत मी मोठा नेता नाही...
पुणे : नरेंद्र मोदींनी (narendra modi) त्यावेळी राष्ट्रवादीला सरकार स्थापन्याची ऑफर दिली होती. असे शरद पवार (sharad pawar) कितीही सांगत असले तरी, पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच राहिला आहे. असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला. दरम्यान भाजपचे राज्यात सरकार कधी येणार असे विचारताच, त्यांनी ' नया साल नई उमंग' असा नवा नारा देत आपला आशावाद कायम ठेवला.
पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, मोदी आणि पवारांचं नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्या इतपत मी मोठा नेता नाही, पण शरद पवारांचा बोलण्याचा इतिहास अगदीच खरा आहे असंही नाही. पाच दिवसांच्या अधिवेशनात समाजाचा कुठलाच प्रश्न मार्गी लागलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने फक्त बहुमताच्या जोरावर स्वतः च्या फायद्याचे विद्यापीठ सुधारणा कायद्यासह १९ विधायके मंजूर करून घेतली आहेत. पेपर फुटीवरही भूमिका नाही, वीज बील माफीवर सभागृहात चर्चा नाही, केवळ ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सरकारने मान्य करून घेतल्या असल्याचे पाटील म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही नियमबाह्य पद्धतीने पुढे रेटण्याचा या अधिवेशनात प्रयत्न झाला, पण आम्ही तो हाणून पाडला. यावेळी सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना खरमरीत पञ लिहून दमबाजीचाही प्रयत्न केला. पण राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा ज्या नेत्याच्या सल्ल्याने हे आघाडी सरकार चालते, त्या रिमोट कंट्रोलने फोन करून राष्ट्रपती राजवट लागेल अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्ष निवड न करता अधिवेशन गुंढळण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, आघाडी सरकारचा एक मोठा नेता प्रचारासाठी उपलब्ध नसल्यामुळेच, महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असाव्यात, ओबीसी आरक्षणाचं फक्त नाव असल्याचे ते यावेळी म्हणाले. नितेश राणे कारवाई प्रकरणी बोलताना पाटील यांनी, पोलिसांवर कोण दबाव टाकतंय, तिथल्या एसपीना कोण फोन करतंय? हे सर्वांना ठाऊक आहे, पण राणे या सगळ्यांना पुरून उरतील असे ते म्हणाले.