शिवराज राक्षेने ‘ऑलिम्पिक’मध्ये खेळावे : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 09:54 AM2023-01-16T09:54:17+5:302023-01-16T09:56:00+5:30
माेदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा सत्कार करण्यात आला...
पुणे :महाराष्ट्र केसरीची शेवटची कुस्ती टीव्हीवर पाहताना मी थाेडा अस्वस्थ हाेताे. कारण दाेघे एकाच तालमीत वाढलेले लढत हाेते; पण शिवराजने कर्तृत्व दाखविले आणि त्याच्या मेहनतीचे चीज झाले. महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा आहे; पण इतकाही महत्त्वाचा नाही. शिवराजने राष्ट्रीय, तसेच आशियाई स्पर्धेत खेळण्यासह अनेक वर्षांपासून कुस्तीगिरांचे स्वप्न पूर्ण करीत ऑलिम्पिकमध्ये गेले पाहिजे, असा आशावाद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
माेदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला प्रशिक्षण देणारे वस्ताद काका पवार उपस्थित हाेते. आजचा दिवस खाशाबा जाधव यांचा आठवण काढण्याचा आहे. त्यांनी जे केले ते कर्तृत्व स्मरून शिवराजने कामगिरी करावी, अशी आशा व्यक्त करून, त्यासाठी शिवराजला जी साथ पाहिजे ती देऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.
खेळाडूंना मदत करण्यासाेबत त्यांना उत्तम प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम काका पवार आणि सहकाऱ्यांनी केल्यामुळे किरण भगत, अभिजित कटके, हर्षवर्धन सदगीर, सुशांत दुबे, उत्कर्ष काळे, राहुल आवारे आणि शिवराज राक्षे या विजयी खेळाडूंची मालिकाच तयार झाल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
भारतीय खेळाची किंमत राखावी
मी क्रिकेटसाेबत कबड्डी, खाे-खाे या खेळांना अनेक वर्षे सहकार्य केले. २५-३० वर्षे कुस्ती फेडरेशनची जबाबदारी सांभाळली. संकटात सर्वांच्या पाठीशी उभा राहिलाे. गेल्या पाच-सहा वर्षांत ग्रामीण पार्श्वभूमीतून कुस्तीपटू पुढे आले आहेत. ते धनाढ्य नाहीत. पुणे, काेल्हापुरात राहून तयारी करणे खर्चिक असते. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.