पवार साहेब, तुम्हीच पीडितेला न्याय मिळवून द्या; चित्रा वाघ यांचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:14 PM2022-03-02T15:14:20+5:302022-03-02T15:20:26+5:30
शिक्षा होत नाही म्हणून विकृती वाढते....
पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊनही जामीन मिळाला. पोलिसांनी न्यायालयात केस लावून का धरली नाही? राज्य सरकारच्या बगलबच्च्यांचा बचाव करण्यात तत्परता दाखविण्यात पुणे पोलीस आयुक्तांनी ‘पीएच.डी.’ केली आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (bjp chitra wagh) यांनी पत्रकार परिषदेत गेला. पीडितेला पवार साहेबांपर्यंत पोहोचू दिले नाही. साहेब, आता तुम्हीच यात लक्ष घाला आणि न्याय मिळवून द्या, असे साकडे त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घातले.
शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पाचच दिवसांत जामीन मंजूर करण्यात आला. यावर वाघ यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘पीडिता मदत मागत असतानाही तिला न्याय मिळेनासा झाला आहे. ती जिवंत आहे, हा तिचा दोष आहे का? पूजा चव्हाणप्रमाणे तिचे बरे-वाईट झाल्यावरच आपण कँडल मार्च काढणार आहोत का? स्वत:साठी लढणारी ही खरी निर्भया आहे. भाजप तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.’ कुचिक पीडितेच्या गर्भपाताबाबत फोनवर संभाषण साधत असल्याच्या दोन ऑडिओ क्लिप त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकवल्या.
वाघ म्हणाल्या, ‘बलात्काराचा गुन्ह्याला हनी ट्रॅपचे, राजकीय षडयंत्राचे नाव देताना आरोपीला लाट वाटत नाही. निर्लज्जपणा, मुजोरीपणा, खोटेपणा याचे हे धडधडीत उदाहरण आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पीडितेने तक्रार केल्यावर त्यांनाच त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. आरोपी हा सत्ताधारी पक्षाचा नेता असल्याने सगळ्यांची अळीमिळीगुपचिळी सुरू आहे. सरकार केवळ अस्मितेच्या, महिला सक्षमीकरणाच्या पोकळ गप्पा मारते. पीडितेला न्याय मिळाला नाही, तर पूजा चव्हाण यांची पुनरावृत्ती होईल.’
शिक्षा होत नाही म्हणून विकृती वाढते
यासंदर्भात गृहमंत्र्यांशी चर्चा करणारच आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांनी तत्काळ दखल घ्यावी. आरोपींना शिक्षा होत नाही म्हणून विकृती वाढते. अशा वेळी सरकारची भूमिका महत्त्वाची असते. आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी. आम्ही प्रश्न विचारत राहणार, त्यांना उत्तरे द्यावी लागतील. हे प्रकरण महिला आयोगाच्या लक्षात आले नाही का, असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.