शरद पवारांनी पुणे मतदार संघातून लढावे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 06:58 AM2018-10-06T06:58:59+5:302018-10-06T06:59:30+5:30
राष्ट्रवादीचा आग्रह : लोकसभेसाठी जागांच्या अदलाबदलीची तयारी
मुंबई : पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धरला असून तसे सूतोवाच प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले आहे. पुणे मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ घातली असली, तरी राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा सांगितला आहे. परभणी आणि अमरावती या जागांची अदलाबदल करावी, अशी आमची मागणी असल्याचे काकडे यांनी सांगितले. पुणे लोकसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे काँग्रेसकडे आहे. मात्र मागच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पराभूत झाला. येत्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुण्यातून लढावे, असा आग्रह पक्षातून धरला जात आहे. यावर पवारांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. मात्र, ऐनवेळी ते होकार देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखविला.
चर्चेत बाधा आणू नये - अशोक चव्हाण
जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्वरूपात आहे. जेव्हा सगळे ज्येष्ठ नेते चर्चेला बसतील, त्या वेळी या सगळ्या विषयांची चर्चा होईल. मात्र, अन्य कोणाच्या मागण्यांवर मला काहीही बोलायचे नाही. आघाडी होणार आहे, पण ज्यांचा या चर्चेशी संबंध नाही अशांनी त्यात नको ती विधाने करून बाधा आणू नये, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काकडे यांना लगावला.