शरद पवारांनी मला मोजत बसू नये, सोयीने ‘प्रबोधनकार’ वाचू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:37+5:302021-08-21T04:15:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र ...

Sharad Pawar should not count me, should not read 'Prabodhankar' easily | शरद पवारांनी मला मोजत बसू नये, सोयीने ‘प्रबोधनकार’ वाचू नये

शरद पवारांनी मला मोजत बसू नये, सोयीने ‘प्रबोधनकार’ वाचू नये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे, यासाठी मी ‘ते’ विधान केले होते. माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध,” असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मी काय वाचले हे माझे मला माहिती आहे. मी प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले आहेत. ‘प्रबोधनकारां’ची पुस्तके वाचली आहेत का? हा प्रश्न कुठून आला? ‘प्रबोधनकारां’चे सोयीनुसार वाचन तुम्ही करता का, असा प्रश्न ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. “उगाच मला मोजायचा प्रयत्न करू नका. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला परवडणारे नाहीत. पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला कळेल, या शब्दांत ठाकरे यांनी पवारांना फटकारले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकी वाढदिवसानिमित्त ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊन शरद पवार यांनी राज यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे लेखन वाचण्याचा सल्ला दिला होता. त्याला राज यांनी शुक्रवारी (दि.२०) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

ठाकरे म्हणाले, “एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हटले होते. मग, तुमच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांनी न होता ‘फुले-शाहू-आंबेडकर’ अशी कशी होते? तुम्ही यांचा विचार घेऊन पुढे जाणार तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा मूळ विचार घेऊन पुढे का जात नाही,” असा सवाल त्यांनी शरद पवारांना उद्देशून केला.

“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे ते ‘ब्राह्मण’ आहेत म्हणून नव्हे तर ते इतिहास संशोधक आहेत म्हणून मी जातो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. त्यांच्या पुस्तकाची पन्नास साली पहिली आवृत्ती आली. तेव्हापासून काही पुढे आले नाही. राजकारणासाठी एजंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवले जाते. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. हे सगळं व्यवस्थित नियोजन होते,” असा आरोपही ठाकरे यांनी केला. जाती-जातीत तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. जातीचे संदर्भ देऊन ऐतिहासिक संदर्भ सांगण्याचा काही संबंध आहे का? महाराष्ट्राला खेळवले जात आहे. जनतेने हे समजून घ्यावे, असे ते म्हणाले.

Web Title: Sharad Pawar should not count me, should not read 'Prabodhankar' easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.