"शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 06:24 PM2019-12-23T18:24:51+5:302019-12-23T18:25:52+5:30
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
पुणे : एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होते. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते असे सांगत शरद पवारांवर निशाणा साधला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सुधीर ढवळे, अरुण परेरा यांना अटक केली तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. 18 फेब्रुवारी 2014ला मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तेव्हा माओवादी संघटनेच्या यादीत कबीर कला मंचाचे नाव होते. म्हणजे, मनमोहन सरकारच्या काळात झालेली अटक योग्य आणि आमच्या काळात अटक झाली तर जातीयवाद कसा असू शकेल? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. याचबरोबर, शरद पवारांनी सोयीची भूमिका घेणे योग्य नाही. यामुळे पोलिसांचे मनोबल खचू शकते. एफआयआर झाला तर तपास झाला असेलच, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने बधितांना 25 हजार हेक्टरी देऊ अशी घोषणा केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट काळात केलेली मदत सोडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देशात मोठ्या राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त चांगली स्थिती महाराष्ट्राची आहे. राज्याच्या तिजोरीत जास्त पैसे नाहीत, मात्र इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती आहे. सकल उत्पन्न 15.8 टक्के आहे. ऋणभार कमी आहे असून महसूल तूट मर्यादेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होते. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून काहींना आत टाकण्यात आले. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे शरद पवारांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.