हल्ल्याला उद्रेक म्हणणारेच हल्ला करणाऱ्यांचे सल्लागार- डॉ. नीलम गोर्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:48 PM2022-04-09T15:48:18+5:302022-04-09T15:55:06+5:30
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एस.टी. कामगारांनी केलेला हल्ला निषेधार्ह आहे. हा हल्ला म्हणजे ...
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एस.टी. कामगारांनी केलेला हल्ला निषेधार्ह आहे. हा हल्ला म्हणजे कामगारांचा उद्रेक आहे असे म्हणत त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणारेच त्या कामगारांचे सल्लागार असावेत अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे (nilam gorhe) यांनी केली.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, कोणत्याही आंदोलनात असे कधीही होऊ नये. घरावर हल्ला करणाऱ्या कामगारांचा हेतू निश्चितच चांगला नव्हता. त्यांना पवार यांना इजाच करायची होती. हे पोलिसांचे अपयश आहे असे मला वाटत नाही. परिवहन मंत्री अनिल परब, मी आमचेही बंगले तिथून जवळच आहे. आमच्याही घरासमोर कामगार यायचे, घोषणा देत असत. त्यामुळेच आमच्या निवासस्थानाचे मागचे प्रवेशद्वार आम्ही बंदच ठेवले होते. तिथे पोलिस असायचे व त्यांची गाडीही असायची.
गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे यांचीच ही जबाबदारी आहे असे म्हणणेही योग्य नाही. ते हा प्रकार व्यवस्थित हाताळत आहेत. एसटी कामगारांच्या प्रश्नावर आपण स्वत: दोन बैठका घेतल्या, मात्र नंतर प्रकरण न्यायालयात गेले, अशा वेळी तडजोड करण्यासाठी, बैठक घेण्यासाठी मर्यादा येतात. त्यामुळे पुढे यावर काही केले नाही असे डॉ. गोर्हे म्हणाल्या.
आंदोलनात एसटीशी संबधित नसलेल्या शक्ती हस्तक्षेप करत असल्याचेही नाकारता येत नाही असा संशय त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही आंदोलनात अशा प्रकारे कोणाही नेत्याच्या घरावर थेट हल्ला करणे अयोग्य आहे. पोलिस तपासात यातील सर्व गोष्टी उजेडात येतीलच, त्यावेळी कोण यामागे आहे ते समजेल असा विश्वास डॉ. गोर्हे यांनी व्यक्त केला.
यावेळी गोर्हे यांच्यासमवेत माजी आमदार चंद्रकात मोकाटे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, महिला आघाडी प्रमुख संगीता ठोसर, गजानन थरकुडे, विकास पासलकर उपस्थित होते.