शरद पवार खोटं बोलले; बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही, ब्राह्मण महासंघाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 02:37 PM2022-05-23T14:37:23+5:302022-05-23T14:54:33+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ब्राह्मणांना आरक्षण हवे हा मुद्दाच निघालेला नाही
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ब्राह्मणांना आरक्षण हवे हा मुद्दाच निघालेला नाही. पवार यासंदर्भात जे सांगतायेत ते खोटं असल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला. शनिवारी सायंकाळी राज्यातील १२ संघटनांच्या ४० प्रतिनिधींची पवार यांच्या समवेत पुण्यामध्ये काही मुद्द्यांवरून बैठक झाली होती.
स्वत: पवार यांनीच या बैठकीची माहिती पत्रकारांना देताना काही प्रतिनिधींनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती असे सांगितले होते. हे शक्य नाही असे सांगताना आपल्याकडील काही आकडेवारीची माहिती त्यांना दिली. त्यावरून लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये या समाजाची संख्या जास्त दिसते. त्यामुळे आरक्षण मिळणे शक्य नाही, मात्र ग्रामीण भागातून शहरांमध्ये येणाऱ्या ब्राह्मण समाजातील युवकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची बैठक करून देण्याचे आश्वासन त्यांना दिले असे पवार यांनीच बैठकीत सांगितले.
आता कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, आरक्षणाचा विषयच बैठकीत झालेला नाही. यासंबधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कोणालाच आरक्षण नको अशी काहीजणांची भूमिका होती, मात्र पवार यांनी त्याचे खंडन करताना दलित, आदिवासी तसेच मागास समाजाला त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षण असायला हवे अशी भूमिका व्यक्त केली. ब्राह्मण समाजाचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही, घटनेने दिलेले आरक्षण समाजाला मान्यच आहे. त्या बैठकीत ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे असा मुद्दा कोणीच मांडलेला नाही असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. बैठकीला उपस्थित अन्य ५ संघटनांनीही असा खुलासा केला असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान ब्राह्मण समाजाच्या काही संघटनांमध्येच या बैठकीवरून वादावादी सुरू झाल्याची चर्चा आहे. या बैठकीला गेलातच का, बैठकीला हजर होते ते म्हणजे समस्त ब्राह्मण समाज नाही, पवारांसारख्या कोणालाही खिशात घालणाऱ्या नेत्यासमवेत बैठक घेतलीच कशाला असे आक्षेप यावर घेण्यात येत आहेत.