अरुण साधू, सिंहासन आणि शरद पवार : पुण्यात जागवल्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:33 PM2018-06-18T14:33:01+5:302018-06-18T14:33:01+5:30
नोट ''ओव्हररूल'' करण्यात माझा हातखंडा असल्याने तसे करत मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले अन् त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली.
पुणे : अरुण साधू यांचे लिखाण कायमच मराठी भाषेची उंची राखणारे होते अशा शब्दात असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंहासन चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. अरुण साधू यांच्या स्मृत्यर्थ विज्ञानापासून सामाजिक विषयापर्यंत संशोधन करणाऱ्या विद्यार्थी, पत्रकारांना आर्थिक पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेच्या घोषणेसाठी ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी साधू यांच्या कादंबरीवर आधारित झिपऱ्या चित्रपटाचा खेळही दाखविण्यात आला.या प्रसंगी पवार बोलत होते. व्यासपीठावर खासदार कुमार केतकर, डॉ उज्ज्वला बर्वे, अरुणा साधू, अश्विनी दरेकर उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना सिंहासन चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी कथेच्या मागणीनुसार मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावेळी अशा प्रकारे चित्रपटासाठी मुख्यमंत्री कार्यालय उपलब्ध करून देणे अयोग्य असल्याची टिप्पणी सामान्य प्रशासन विभागाने पाठवली होती. मात्र अशा नोट ''ओव्हररूल'' करण्यात माझा हातखंडा असल्याने तसे करत मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले अन् त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली, अशी आठवण त्यांनी सांगताच उपस्थितांनी हसून दाद दिली. केतकर यांनी बोलताना ही शिष्यवृत्ती म्हणजे साधू यांना आदरांजली वाहण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले. या मार्फत पत्रकारितेशी निगडीत अथवा निगडीत नसलेल्या पण संशोधन करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार असल्याचे सांगितले.