सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:04 PM2024-08-26T13:04:01+5:302024-08-26T13:04:44+5:30
समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं
पुणे : राज्यातील पुरोगामित्व टिकविण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे पूर्ण ताकदीने काम करीत आहेत. त्यामुळे जाती-पातीचे राजकारण दुसरे लोक करीत आहेत. त्या लोकांबाबत बोलाल तर मी समजू शकतो. पण शरद पवार यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी व पक्षप्रवेशानिमित्त पाटील पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्ते, कलाकार, लेखक, संगीतकार यांनी पक्षप्रवेश केला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.
राज्यात जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्या आरोपाबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले आहेत. समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षात लोक प्रवेश करत आहेत. अनेक लोकांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे आहे. अजून आम्ही इंदापूरपर्यंत पोहोचलो नाही. आमदार अतुल बेनके यांच्या मनात काय आहे मला माहीत नाही. मदन भोसले यांना मी भेटलो आहे. पण पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मी त्यांच्याकडे चहाला गेलो होतो. समरजित घाटगे यांचा ३ सप्टेंबरला पक्षप्रवेश होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्याचे सरकार हे नाकर्तेपणाचे लक्षण असणारे
"राज्य सरकार हे केवळ लाडकी बहीण या एकाच योजनेभोवती फिरत आहे. बाकी राज्यात कुठल्याच योजना, कुठलेच विषय त्यांना दिसत नाहीत. बदलापूरची घटना सामान्य माणसाला चीड आणणारी आहे. यावर कोणी राजकारण करायची गरज नाही. लहान बालक सुरक्षित नाहीत, हे सरकार नाकारत आहे. महिला सुरक्षित नाहीत. इतके नाकर्तेपणाचे लक्षण यापूर्वीच्या कुठल्याही सरकारमध्ये नव्हते. त्यामुळे राज्यातील सरकार अक्षरशः अपयशी ठरलेले आहे. आमचा कोणत्या योजनेला विरोध नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांची राजकीयदृष्ट्या योग्य पद्धतीने पावले चालली असतील. मराठा समाजात आजही दारिद्र्य, अल्पभूधारक असे प्रश्न काय आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जागावाटपाबाबत काही वाद होणं अपेक्षितच
विधानसभेच्या २८८ जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत काही वाद होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणं, त्याबद्दल वाद होणार नाही, असं होणार नाही. पण शेवटी आम्हाला एकत्र राहायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.