शरद पवारांनी उलगडला ‘सिंहासन’चा पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:42 AM2018-06-19T05:42:09+5:302018-06-19T05:42:09+5:30
‘सिंहासन’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो.
पुणे : ‘सिंहासन’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. चित्रपटाच्या प्रभावी मांडणीसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि निवासस्थान उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावर हे कसे अयोग्य असल्याची भलीमोठी नोट सामान्य प्रशासन विभागाने मला पाठवली. ती नोट नाकारून मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले. त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली,अशी आठवण सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नोट ‘ओव्हररूल्ड’ करण्यात माझा हातखंडा असल्याची मिस्किल टिप्पणी केली.
ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, आशय फिल्म क्लब, एआरडी एंटरटेनमेंट यांच्या वतीने साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरूण साधू स्मृती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे पत्रकारितेच्या व्यवसायाशी संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांसह संशोधकांना पाठ्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात पवार बोलत होते.
याप्रसंगी राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, एआरडी एंटरटेनमेंटच्या अश्विनी दरेकर, ग्रंथालीचे दिनकर गांगल आदी उपस्थित होते. यावेळी बुट पॉलिश करुन शिक्षण घेणाºया दोन विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देण्यात आली. ‘झिपºया’ चित्रपटाचा विशेष खेळही दाखविण्यात आला.
केतकर यांनी पाठ्यवृत्ती योजनेमागची संकल्पना स्पष्ट केली. साधू यांच्या स्मृती जपण्यासाठी वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित असलेल्या, विज्ञानापासून सामाजिक विषयांपर्यंत संशोधन करणाºया विद्यार्थी, पत्रकारांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल.
>ते कोणत्याही चौकटीत बसणारे साहित्यिक नव्हते
मराठी साहित्याचा दर्जा सर्वोत्तम कसा राहील, यासाठी अरुण साधू नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांचे लिखाण वाचकांच्या अंत:करणाला भिडणारे होते. त्यांचे साहित्य आणि लिखाण इतर भाषांमध्येही गेले. छोट्याशा गावातून आलेले साधू मुंबईकर झाले आणि मुंबईच्या व्यथावेदनेतून आपल्यातील अस्वस्थतेला शब्दबद्ध केले, असेही पवार म्हणाले. ते म्हणाले, साधू यांनी मुंबईचे अस्वस्थ वास्तव, लोकलच्या परिसरात राहणाºया तरुणांची सुखदु:खं प्रभावीपणे मांडली. आपल्या लेखनातून मराठी साहित्याला उच्च दर्जा मिळवून दिला. ते कोणत्याही एका चौकटीत बसणारे साहित्यिक नव्हते.