देशाच्या नेतृत्वाला द्वेष निर्माण करायचाय : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:05 PM2018-07-06T21:05:50+5:302018-07-06T21:06:29+5:30
कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली
पुणे : देशात परिस्थिती इतकी खालावली आहे की, कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुण्यातील ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील,खासदार वंदना चव्हाण, शिक्षणतज्ञ डॉ पी ए इनामदार उपस्थित होते.
आज समाजाची स्थिती वेगळी आहे. जिथे बंधुभाव संपतो तिथे द्वेषाचा माहोल तयार होत असून अशा परिस्थितीत देशाची प्रगती संपते. दुर्दैवाने हीच स्थिती आज देशात दिसत आहे. कधी मुस्लिम तर कधी इसाई समाजाच्या व्यक्तीवर हल्ले होतात आणि सांगितलं जातं हे हल्ले करणं हा आमचा अधिकार आहे.
आज मला विचारलं, तुम्हाला फर कॅप घालू का ? त्यावर मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेले मौलाना अबुल कलाम आझाद जी टोपी घालायची मला का लाज वाटावी असे उत्तर देत फर कॅप घातली. ज्यांच्या हातात देशाचा नकाशा त्यांना फर कॅप घालण्यात लाज वाटते अशा भाषेत त्यांनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या कार्यक्रमात न घातलेल्या टोपीचा उल्लेख केला. आजूबाजूच्या देशात फार चांगली स्थिती नाही. अशावेळी द्वेषाचा माहोल पसरणार नाही याची आपण काळजी घेऊ असेही ते म्हणाले.
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाबत केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, शेट्टी यांनी बोलताना इसाईंचे योगदान नाही असे म्हटले. त्यांना लाज वाटली पाहिजे ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळच्या स्थापना सदस्या अँनी बेझंट या इसाई होत्या.