३१व्या पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन ६ सप्टेंबरला शरद पवारांच्या हस्ते होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 07:31 PM2019-08-31T19:31:54+5:302019-08-31T19:33:04+5:30
यंदा ज्येष्ठ उद्योगपती राहल बजाज आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे.
पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या '' ३१ व्या पुणे फेस्टिव्हल'' चे उदघाटन शुक्रवार, दि.६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, खासदार गिरीश बापट, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार असल्याची माहिती फेस्टीव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी दिली. यावेळी डॉ. सतीश देसाई, कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.
पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरीक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या उदघाटन सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा-या व्यक्तींना 'जीवनगौरव पुरस्कार' व 'पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड ' देऊन गौरविले जाते. यंदा ज्येष्ठ उद्योगपती राहल बजाज आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. तसेच महिला उद्योजिका उषा काकडे, प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, व बॉडी बिल्डर संग्राम चौघुले यांना पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड देऊन गौरवले जाईल.
यंदाच्या पुणे फेस्टिव्हलच्या उदघाटन सोहळ्यास जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने प्रारंभ होईल. यानंतर पंचजन्य शंखनाद' पथकातर्फे २० युवक युवतींनी सलवार, झब्बा, उपरणे व पुणेरी पगडी अशा पेहेरावात सादर केलेला सामूहिक शंखध्वनी कार्यक्रम सादर होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ नृत्यांगना अभिनेत्री व पुणे फेस्टिव्हलच्या पॅटन हेमा मालिनी यांचा बॅले हे विशेष आकर्षण असणार आहे. गेल्या ३० वर्षात एकूण २७ वेळा त्यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये बॅले/गणेश वंदना सादर केली आहे. यावर्षी 'गंगा' हा त्यांचा बॅले रविवार, दि.८ सप्टेंबर रोजी त्या सादर करणार आहेत. याशिवाय ऑल इंडिया उर्दू मुशायरा, अ.भा. हिंदी हास्य कला संमेलन, मराठी हास्य कविसंमेलन महिला महोत्सवात मिस पुणे फेस्टिव्हल, नृत्य, पेंटिंग्स, पाककला अशा विविध स्पर्धा, केवळ महिलांसाठी लावणी, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, उगवते तारे व इंद्रधन मराठी नाटक, वाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, गायन, हिंदी मराठी गाण्यांचे कार्यक्रम व विविध क्रीडा स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल महोत्सवात राहाणार आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात शताब्दी साजरी करणाऱ्या कस्तुरी चौक मित्र मंडळ आणि निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळ यांचा महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे.
........
सौरभ रावांच्या हस्ते होणार श्रीं ची प्रतिष्ठापना
पुणे फेस्टिव्हलच्या 'श्रीं'ची प्रतिष्ठापना सोमवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडीयम येथे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते विधीवत संपन्न होईल. याप्रसंगी अभिनेत्री गिरीजा प्रभू व अभिनेत्री मानसी मुसळे उपस्थित राहणार आहेत. वेदमुर्ती धनंजय घाटे गुरुजी याचे पौरोहित्य करतील.पूरग्रस्तांना दिली जाणार 2 लाखांची मदत
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून पुणे फेस्टिव्हलतर्फे २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले जाणार आहेत.