'निवडून येणार असेल तर...! पर्वती विधानसभेच्या जागेबाबत शरद पवारांनी आबा बागुल यांना दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 02:55 PM2024-07-16T14:55:36+5:302024-07-16T14:55:54+5:30

काँगेसने सगळ्यांना आमच्याकडे संधी दिली आहे, मला अजून संधी दिलीच नाही ती द्यावी, मी निवडून येऊ शकतो

Sharad Pawar words to aba Bagul regarding Parvati assembly seat in pune | 'निवडून येणार असेल तर...! पर्वती विधानसभेच्या जागेबाबत शरद पवारांनी आबा बागुल यांना दिला शब्द

'निवडून येणार असेल तर...! पर्वती विधानसभेच्या जागेबाबत शरद पवारांनी आबा बागुल यांना दिला शब्द

पुणे : विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच पर्वती विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू झालीये. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) मागून घेण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे. भाजपचे इच्छुक सध्या सरकारी योजनांचा जोरदार प्रचार करत आहेत तर काँग्रेसकडून भोजनावळी आयोजित केल्या जात आहेत. अशातच लोकसभेच्या वेळी नाराज झालेले काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आबा बागुल यांनी शरद पवार यांची मोदीबागेत आज भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवारांना पर्वती विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. 

दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात या मतदारसंघावरून धुमश्चक्री सुरू आहे. माजी उपमहापौर आबा बागूल काँग्रेसचे आहेत. त्यांना इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे, मात्र मतदारसंघच पक्षाकडे नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. सलग ६ वेळा ते नगरसेवक होते. आता आमदार व्हायचेच या इराद्याने ते कामाला लागले आहेत. काहीही करा, पण हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, अशी त्यांची मागणी असून त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करण्याचे, पक्षाच्या कार्यालयासमोर जाहीर आंदोलन करण्याचे उपायही अवलंबून पाहिलेत. आता ते डिनर डिप्लोमसीचा वापर करत असल्याची चर्चा आहे.

बागुल म्हणाले, आता एक एक उमेदवारी महत्वाची आहे. मी साहेबांना विनंती केली कि, पर्वती विधानसभा ही काँग्रेसला सोडा. साहेब म्हणाले, निवडून येणार असेल तर आम्ही विचार करू. काँग्रेसने सगळ्यांना आमच्याकडे संधी दिली आहे. मला अजून संधी दिलीच नाही ती त्यांनी द्यावी. मी निवडून येऊ शकतो. गेली ३० ४० वर्ष मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडीत अनेक जण इच्छुक आहेत तर तुम्हाला संधी मिळेल का? असे बागुल यांना विचारले असता ते म्हणाले,  शेवटी पक्षश्रेष्टी ठरवतील ते होणार, पक्षश्रेष्ठीचा आदेश महत्वाचा असतो. मी निवडणुकीवर ठाम असून काही होत नाही. मी फक्त विनंती करणार आहे. पण मला उमेदवारी मिळाली तर १०० टक्के आमदार होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

भाजपात सर्वाधिक इच्छुक

भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचेच माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर हेही या मतदारसंघातून उमेदवारी मागण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाही आपली आमदारकी कायम ठेवायची आहे. सरकारच्या योजनांचा प्रचार, मतदार नोंदणी अशा उपक्रमांमधून या सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. इच्छुकांच्या संख्येमुळे मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छुकांनुसारच गट तयार झाले आहेत, मात्र यातून पर्वती मतदारसंघात निवडणूकीआधीच निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Sharad Pawar words to aba Bagul regarding Parvati assembly seat in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.