शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते कॅबिनेट मंत्री व्हाया विधानसभा अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:47 PM2019-12-30T15:47:19+5:302019-12-30T15:51:35+5:30
पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची सध्या सर्वाधिक चर्चा असली तरी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे दिलीप वळसे पाटील यांचीही कारकीर्द तितकीच प्रदीर्घ आणि दमदार आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्राथमिक ओळख आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची सध्या सर्वाधिक चर्चा असली तरी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे दिलीप वळसे पाटील यांचीही कारकीर्द तितकीच प्रदीर्घ आणि दमदार आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्राथमिक ओळख आहे.
वकिलीची पदवी घेतल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काहीकाळ काम केले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात असा जम बसवला की सलग सातव्यांदा ते निवडून आले आहेत. १९९० साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर नावापुढचे आमदार पद कायम आहे. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २००१ पासून त्यांच्याकडे उर्जा खात्याचाही कार्यभार आला. राज्याला भारनियमनमुक्त करण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. डिसेंबर २००८ ते नोव्हेंबर २००९ या काळात अर्थ आणि नियोजन मंत्री म्हणून त्यांनी काम केले. २००९ ते २०१४ या काळात विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्याहीवेळी आक्रमक सदस्यांना न दुखावता शांतपणे थांबवण्याचे काम त्यांनी लीलया केले होते. सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची उभारणी त्यांनी केली. साखर उद्योगात संपूर्ण महाराष्ट्रात अभ्यासू म्हणून वळसे पाटील ओळखले जातात.
शांत, अभ्यासू, मुद्देसूद आणि अबोल स्वभावाचे वळसे पाटील क्वचितच भरभरून बोलतात. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना ज्येष्ठत्वाचा मान आहे. त्यांची मंत्रिपदाची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. त्यांच्या निवडीने मंत्रिमंडळात एक अनुभवी सदस्य समाविष्ट करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.