शरद पवारांचा सध्या 'बेटी बचाव'चा नारा : मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 10:59 PM2019-04-20T22:59:38+5:302019-04-20T23:02:40+5:30
नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणे 'बेटी बचाव'चा नारा दिला, त्याप्रमाणे आता शरद पवार 'बेटी बचाव, बेटी बचाव' असं म्हणत आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लगावला
पुणे : नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणे 'बेटी बचाव'चा नारा दिला, त्याप्रमाणे आता शरद पवार 'बेटी बचाव, बेटी बचाव' असं म्हणत आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लगावला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रासपचे महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनीही मोदी यांचा गुण घेतला आहे. मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या 'घरात घुसून मारण्याची' भाषा करत असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
राष्ट्रवादीवर आणि राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला भाड्याने वक्ते आणावे लागत आहेत. बस, सायकल भाड्याने घेतात पण पवार साहेबांनी इंजिन घेतलं आहे. तेही बंद पडलेलं आहे. ते ना विधानसभेत चाललं, ना पालिकांमध्ये जे लोक पहिल्या बॉलवर आउट होतात त्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये.
मुख्यमंत्री म्हणाले, कितीही वेळा म्हणालात लाव रे व्हिडीओ, लाव रे व्हिडीओ मग जर 2014सालचा व्हिडीओ लावला तर काय होईल? राहुल गांधी यांचे पणजोबा, आजी, वडील आले पण गरिबी हटवली नाही. आता काय खाऊन ते गरिबी हटवणार.