माढा लढण्याचा शरद पवारांचा विचार, राजकीय गणित 'असं' बदलणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 01:33 PM2019-02-11T13:33:51+5:302019-02-11T14:41:55+5:30

निवडणुकीत कोण कधी रिंगणात उतरेल आणि कोण कधी कुणाला पाठिंबा देईल, याचा काही नेम नसतो. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळाली पाहिजे आणि ती आपल्याचकडे राहिली पाहिजे, यासाठी सगळा खटाटोप केला जातो.

Sharad Pawar's candidature will change the political plus minus madha matdarsangh..! | माढा लढण्याचा शरद पवारांचा विचार, राजकीय गणित 'असं' बदलणार!

माढा लढण्याचा शरद पवारांचा विचार, राजकीय गणित 'असं' बदलणार!

googlenewsNext

- धनाजी कांबळे - विजयाची खात्री असलेल्या मतदारसंघात अनेकजण फिल्डिंग लावतात. असाच एक खात्रीचा मतदारसंघ म्हणजे माढा. याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

...................

सत्ताधारी भाजपा सरकारचा कार्यकाळ अगदी काही दिवसांत संपेल आणि साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. मात्र, लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांवर कोण कोण कुठून उभे राहील, याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. काही पक्षांनी उमेदवारदेखील निश्चित केले आहेत. फक्त आता त्यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी कृषीमंत्री शरद पवार हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. ज्यांचे देशपातळीवरील नेतृत्त्व वादातीत आहे. त्यांच्या शब्दाला विशेष महत्त्व देशपातळीवर आहे. विशेषत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री, कृषीमंत्री म्हणून त्यांनी अतिशय मूलभूत काम केलेले आहे. मात्र, सध्या ते खूपच चर्चेत आहेत. त्यात देशपातळीवर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात महाआघाडी बनविण्याच्या प्रक्रियेतील ते एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळेही त्यांच्या नावाची चर्चा आहे. आणि आता ते खुद्द माढा (जि. सोलापूर) मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. अर्थात कार्यकर्त्यांनी तसा आग्रह केला असून, माझी इच्छा नाही, पण विचार करून सांगतो, असे सूचक उत्तर पवार यांनी दिले आहे. असे असले तरी शरद पवार हे कोणतीही कृती केवळ तात्कालीक फायद्यासाठी करीत नाहीत, तर दीर्घपल्ल्याच्या राजकारणाची ती खेळी असते, हे अवघ्या देशाला परिचित आहे. मोदींच्या विरोधात रान उठविण्याची प्रक्रिया सुरू असताना आणि शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघातच भाजपाचे कमळ फुलेल, अशा वावड्या भाजपाचे नेते उठवत असताना माढा मतदारसंघातून पवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली आहे. शरद पवार यांच्याबद्दल आदरच आहे. या वयात त्यांना निवडणुकीची दगदग सहन होणार नाही. तरीही ते माढ्यातून लढले आणि ही जागा भाजपाकडे आली तर आम्ही त्यांचा पराभव करू, असे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असून, त्यांनी आमच्या तब्येतीची काळजी करू नये, असे पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे या चचेर्ला तोंड फुटलेले असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेचा हवाला देऊन काही विरोधक मात्र पवार निवडणूक लढवणार नव्हते, आता अचानक त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची चर्चा ्रकशासाठी सुरू झाली आहे, असा विरोधाचा सूर लावला आहे. किंबहुना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एक जाहीर मुलाखत घेतली होती. त्यातही खुद्द पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मी निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले होते. तरीही आता पवार रिंगणात उतरणार असल्याने या मतदारसंघातील इच्छुक मात्र थोडे धास्तावले असतील, हे निश्चित.पवार यांच्या उमेदवारीला शेकापने पाठिंबा दिल्याचीही चर्चा आहे. माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे पवार निवडणूक लढवतील, असेच सध्या राजकीय तज्ज्ञांना वाटते. 
शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून याआधी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा ५,३०,५९६ इतकी मते मिळवून ते विजयी झाले होते. या वेळी भाजपाच्या सुभाष देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तिसऱ्या क्रमांकावर होते.पवार यांनी साधारण ५७ टक्के मते मिळवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये या मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनाही ४,८९,९८९ इतकी मते मिळाली होती. तर सदाभाऊ खोत यांना ४,६४,६४५ मते मिळाली होती. या वेळी केवळ सुमारे २५ हजार मतांनी विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. या ठिकाणी सदाभाऊ खोत यांना भाजपाचा पाठिंबा होता. त्यामुळेच त्यांना इतकी मते मिळाली होती. तसेच २००९ मध्येही या ठिकाणी भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी ताकद लावावी लागणार असून, या ठिकाणी दिग्गज उमेदवारच बाजी मारू शकेल, अशी स्थिती आज आहे. आता कोणाचीच खात्री नसल्याने पवार यांनाच खुद्द या ठिकाणी उभे करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. 
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा अशी सरळ लढत या मतदारसंघात असताना प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीनेदेखील या ठिकाणी माजी आमदार विजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात धनगर समाजाची ताकदही मोठी आहे. सध्या धनगर समाजात गट पडले असून, त्यातील एक गट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तर एक गट गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर यांच्या बाजूने आहे. त्यामुळे धनगर समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. शरद पवार यांनी या ठिकाणी निवडणूक लढविल्यास विविध समाजांची मते वळविण्यात ते यशस्वी होऊ शकतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. त्यामुळे माढा मतदारसंघातून शरद पवारच निवडणूक लढवतील, असे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. 

Web Title: Sharad Pawar's candidature will change the political plus minus madha matdarsangh..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.