Sharad Pawar | शरद पवारांच्या निर्णयाने पुण्यातील पदाधिकाऱ्यांना धक्का; मविआतही अस्वस्थता
By राजू इनामदार | Published: May 2, 2023 06:04 PM2023-05-02T18:04:21+5:302023-05-02T18:08:51+5:30
दरम्यान पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतही अस्वस्थता आहे...
पुणे : पक्षाध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा शरद पवार यांचा निर्णय अनपेक्षित आहे, त्यामागे काय कारण आहे याची कोणालाही माहिती नाही, मात्र येत्या एकदोन दिवसांतच पुढे काय याबाबत समजेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. पवार आपला निर्णय मागे घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतही अस्वस्थता आहे.
काकडे म्हणाले, “आम्हाला कोणालाच शरद पवार यांच्या या निर्णयाची माहिती नव्हती. मागील काही दिवस राज्यात बऱ्याच राजकीय चर्चा सुरू आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रस्थानी धरूनच होत आहेत. मात्र पवार यांच्या निर्णयामागे त्या गोष्टी आहेत, असे मुळीच म्हणता येणार नाही. त्यांचा हा निर्णय व्यक्तिगत आहे व कार्यकर्त्यांवर, पक्षावर त्याचा परिणाम होणार आहे. देशात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अन्य पक्षांची एकजूट उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यालाही या निर्णयाने धक्का बसेल.
पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी पवार यांना त्यांचा निर्णय मागे घेण्याविषयी विनंती केली आहे. कार्यकर्त्यांनी तर ठिकठिकाणी साकडेच घातले आहे. ते काय निर्णय घेतील, हे सांगता येत नाही. हा निर्णयही त्यांनी कुटुंबाला विचार करून घेतला का? कुटुंबाची गरज म्हणून घेतला का? त्यांच्या या निर्णयामागे कौटुंबिक दबाव वगैरे आहे का? या प्रश्नांवर, याबाबत काहीही सांगता येणार नाही, असे उत्तर देत काकडे म्हणाले की, मीडियाला जशी याची माहिती नव्हती, तशीच आमच्यापैकीही कोणाला ते असा काही निर्णय घेतील, याचा अंदाज नव्हता.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विटरवर पवार यांच्या या निर्णयाने व्यथित झालो असल्याचे म्हटले आहे. भक्तांच्या श्रद्धेसाठी तरी देवाला देवपण सोडता येत नाही. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती आम्ही केली आहे. त्यांनी तसे केले नाही तर माझ्यासह शहरातील अनेक पदाधिकारी पदाचा राजीनामा देतील. देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही, असे जगताप यांनी म्हटले आहे.