'जुनी पेन्शन'साठी शरद पवारांचा पुढाकार; शिक्षक अधिवेशनात केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 07:26 PM2022-03-18T19:26:01+5:302022-03-18T19:28:49+5:30

शरद पवारांसह राज्यातील अनेक मंत्र्यांची उपस्थिती...

sharad pawars initiative for old pension for teachers in maharashtra | 'जुनी पेन्शन'साठी शरद पवारांचा पुढाकार; शिक्षक अधिवेशनात केली घोषणा

'जुनी पेन्शन'साठी शरद पवारांचा पुढाकार; शिक्षक अधिवेशनात केली घोषणा

Next

बारामती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन पनवेल येथे आज पार पडले. या अधिवेशनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी शिक्षकांच्या अनेक मागण्यांवर घोषणा केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कर्नाळा स्पोर्ट क्लब पनवेल येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेते ज्येष्ठ शरद पवार (sharad pawar) होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), माजी अध्यक्ष सुनील तटकरे (sunil tatkare), ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे (aditi tatkare), निलेश लंके, उमेश पाटील, संभाजीराव थोरात यांच्यासह राज्यसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी जुनी पेन्शन हा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. राजस्थान छत्तीसगड या राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करता येते का याबाबत गंभीरपणे चिंतन करून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकल, पती-पत्नी, विस्थापित शिक्षकांच्या सोयीसाठी बदली धोरणात आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी संभाजीराव थोरात यांच्या शिष्टमंडळासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. मुख्यालय राहण्याबाबतचा शासन निर्णय बदलण्यात येईल. मात्र, शिक्षकांनी शालेय कामकाजात वेळेवर उपस्थित राहावे, अशी अपेक्षा ग्रामीण विकास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

१०-२०-३० ही आश्वासित योजना लागू करण्यासाठी अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशीही घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली. २००४ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीमधील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगातील पदवीधर व मुख्याध्यापकांचे वेतन त्रुटीसाठी बक्षी समितीचा खंड २ लवकर प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संगणक परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात येईल व वसुली केलेली वेतनवाढीची रक्कम परत देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कॅशलेस विमा योजना सुरू करण्यात येईल. तसेच केंद्रप्रमुखांची पदे शिक्षकांमधून भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले .

यावेळी बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, हसन मुश्रीफांच्या शिक्षक हिताच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाठिंबा दिला जाईल. यावेळी सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे यांचा शिक्षक संघांमध्ये प्रवेश जयंत पाटील व संभाजीराव थोरात यांच्या शुभ हस्ते घेण्यात आला. प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष अंबादास वाझे यांनी तर स्वागत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी केले, आभार प्रदेश सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी मानले.

Web Title: sharad pawars initiative for old pension for teachers in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.