राज ठाकरेंनी दोन-तीनदा माझं नाव घेतलं, पण...; आरक्षणाबाबतच्या गंभीर आरोपांना शरद पवारांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:36 PM2024-08-12T13:36:01+5:302024-08-12T13:51:23+5:30
शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघे राज्यात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.
Sharad Pawar On Raj Thackeray ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून केलेल्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "राज ठाकरे यांनी दोन-तीनदा माझं नाव का घेतलं, हे मला समजलं नाही. पण मी या रस्त्याने कधी जात नाही. महाराष्ट्र मला थोडाफार ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी राहिलेली नाही. मीही मराठवाड्यात फिरत आहे, मलाही लोक अडवतात आणि निवेदन देतात. मग हेही मीच करत आहे का? मला आडवा आणि निवेदन द्या, हे मीच सांगतोय का?" असा प्रतिप्रश्न पवार यांनी राज ठाकरेंना उद्देशून केला.
राज ठाकरेंनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघे राज्यात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी मी आज मांडलेली भूमिका सामंजस्याची आहे की तेढ वाढवणारी आहे का? राज ठाकरेंनी विनाकारण नाव घेतलं, असं माझं मत आहे."
दरम्यान, "माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे. आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय चित्र राहील, हे सांगता येणार नाही. मी पर्याय सुचवला की, माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली. आता तुमच्यामार्फत असं सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.
राज ठाकरेंनी काय आरोप केले होते?
आरक्षण प्रश्नावरून शरद पवारांवर टीका करताना राज ठाकरेंनी म्हटलं होतं की, "शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल... पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचं राजकारण जाती-जातीत द्वेष निर्माण करणं हेच आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुरू आहे. २००२ किंवा २००३ असेल मला आठवतंय मराठा आरक्षण हवं म्हणून मोर्चा आला होता. जिथे व्यासपीठावर मोर्चा अडवला गेला तिकडे सर्वपक्षीय होते आणि तिथे सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. मग गेल्या इतक्या वर्षात का नाही मिळालं ? मोदी ज्या शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आले असं मोदीच सांगत आहेत, ते गेले १० वर्ष केंद्रात बहुमतात होते मग त्यांनी आरक्षण का नाही दिलं? उद्धव ठाकरे केंद्रात आणि राज्यात ५ वर्ष नांदत होते मग तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाचा आग्रह का नाही धरला? जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागून यांचं विधानसभेचं राजकारण सुरु आहे," असा आरोप राज यांनी केला.
"महाराष्ट्रात जातीचं राजकारण पसरलं नाही पाहिजे ही भूमिका शरद पवारांनी घ्यायला नको का? उलट तेच हातभार लावत आहेत... म्हणून माझी महाराष्ट्रातील सगळ्या जातीतील लोकांना माझी विनंती आहे की यांच्या नादी लागू नका, यांच्या घाणेरड्या राजकारणाला थारा देऊ नका. अन्यथा पुढे जे महाराष्ट्राचं होईल त्याचा विचार पण नाही करवत," असंही राज ठाकरे म्हणाले होते.