शरद पवार अचानक पिंपरी चिंचवडमध्ये दाखल; कोरोनाचा परिस्थितीचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 07:03 PM2020-09-03T19:03:30+5:302020-09-03T19:11:33+5:30
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासन व प्रशासनापुढे आव्हान आहे.
पिंपरी : पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासन व प्रशासनापुढे आव्हान आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवड शहराला ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. पवार यांनी यावेळी महापालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. मात्र, ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरची पाहणी करण्याचे त्यांनी टाळले.
पिंपरीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासन व प्रशासनापुढे आव्हान आहे. त्या अनुषंगाने पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. ऑटो क्लस्टर येथील सेंटर महापालिकेने उभारले आहे. या सेंटरची पाहणी करून कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी गुरुवारी शहराला भेट दिली. दुपारी तीन वाजतापासून महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मुख्यालयातील कोरोना वॉर रुममध्ये महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादरीकरण करून कोरोनाबाबतची माहिती दिली. शहरातील रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदींबाबत पवार यांनी आढावा घेतला.
प्लाझ्माबाबत काय परिस्थिती आहे, असे पवार यांनी विचारले. आवश्यक असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार केले जातात. कोरोनामुक्त रुग्णांकडून प्लाझ्मादान केले जाते. त्यासाठी महापालिकेकडून सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. महापालिकेला त्वरित मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी केरळ येथील परिचारिकांच्या पर्यायाचा विचार केला जात होता. मात्र त्यांच्याकडून दरमहा ४५ हजार रुपये मानधनाची मागणी झाली. याबाबत शरद पवार यांनी आयुक्तांना विचारले. केरळच्या एका परिचारिकेला दरमहा ४५ हजार रुपये मानधन द्यावे लागले असते, त्याच पद्धतीने महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या परिचारिकांकडून देखील तितक्याच मानधनाची मागणी होऊन त्यांनाही तेवढेच मानधन द्यावे लागले असते. त्यामुळे केरळच्या परिचारिकांची भरती केली नाही, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.
जॉर्ज फर्नांडिस यांच्या उपस्थितीत घेतली होती बैठक
शहरातील संरक्षण दलाच्या जागा, रेडझोन आदी प्रश्नांबाबत २००२ मध्ये तत्कालीन दिवंगत संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात बैठक झाली होती. त्यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर पवार यांनी महापालिका मुख्यालयाला भेट दिली.