शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमात गोंधळ ; घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 18:26 IST2020-02-29T18:06:11+5:302020-02-29T18:26:12+5:30
पुण्यात सुरु असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली असली तरी कार्यक्रमस्थळी मात्र घोषणाबाजी सुरु आहे.

शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमात गोंधळ ; घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे :पुण्यात सुरु असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली असली तरी कार्यक्रमस्थळी मात्र घोषणाबाजी सुरु आहे. पोंक्षे यांचा हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी काही संघटनांनी केली होती. त्यानंतरही आयोजकांनी कार्यक्रम रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून कार्यक्रम ठिकाणी पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला आहे. मात्र पोंक्षे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच आगमन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरु केली आहे. गोंधळ करणाऱ्या आंदोलकांना डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये सध्या स्वातंत्रवीर सावरकर विषयावर पोंक्षे यांचे व्याख्यान होणार असून त्यापूर्वी वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे . मात्र हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली होती.
याबाबत बोलताना खरात यांनी लोकमतला सांगितले की, 'जगाला गौतम बुद्धांच्या अहिंसेची गरज आहे. यामुळे धार्मिक आतंकवादी तयार होतील. हिंसेला समर्थन देणाऱ्या शरद पोंक्षे यांनी अटक करावी व कार्यक्रम रद्द करावा. आयोजकांशी संपर्क साधला तर त्यांनी लोकमतला सांगितले की, 'आजचा कार्येक्रम ठरल्याप्रमाणेच होणार आहे. समाज विघातक आणि वीर सावरकरांचा सतत द्वेष करणाऱ्या लोकांच्या धमक्यांना सावरकर प्रेमी घाबरत नाहीत'.
आता हा कार्यक्रम सुरु झाला असला तरी बाहेर फलक घेऊन घोषणाबाजी केली जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी 'महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या गोडसे यांचं समर्थन करणाऱ्या पोंक्षे यांचा निषेध', फर्ग्युसनमधून किती नथुराम तयार करणार' अशा मजकुराचे फलक हातात धरले आहेत.