कर्जरोख्यांचा ‘टक्का’ ठरणार शेअरबाजारात

By admin | Published: June 14, 2017 04:08 AM2017-06-14T04:08:40+5:302017-06-14T04:08:40+5:30

समान पाणी योजनेसाठी महापालिका काढणार असणाऱ्या कर्जरोख्यांची बोली मुंबई शेअरबाजारात २२ जूनला होण्याची शक्यता आहे. त्याची सर्व पूर्वतयारी महापालिका प्रशासनाने

The 'share of debt' will be in the stock exchange | कर्जरोख्यांचा ‘टक्का’ ठरणार शेअरबाजारात

कर्जरोख्यांचा ‘टक्का’ ठरणार शेअरबाजारात

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समान पाणी योजनेसाठी महापालिका काढणार असणाऱ्या कर्जरोख्यांची बोली मुंबई शेअरबाजारात २२ जूनला होण्याची शक्यता आहे. त्याची सर्व पूर्वतयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या या योजनेत एकूण २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यात येणार असून त्याची सुरुवात २०० कोटी रुपयांनी करण्यात येईल. सर्वांत कमी व्याजदराने गुंतवणूक करणाऱ्यांना ही संधी मिळेल.
अशा प्रकारे कर्जरोखे काढून एखाद्या योजनेची सुरुवात करणारी पुणे महापालिका सन २००७ नंतरची देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार आपल्या सहकारी अधिकाऱ्यांच्या साह्याने गेले तब्बल वर्षभर या योजनेवर काम करीत होते. आता सर्व स्तरांवर या योजनेला मंजुरी मिळाली आहे. सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले कर्जरोखेही २२ जूनला मुंबई शेअरबाजारात जाहीर करण्यात येतील.
त्यासाठी प्रशासनाने केलेल्या सर्व तयारीची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आता यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. शेअरबाजाराचे सर्व नियम, अटी, शर्ती त्यासाठी महापालिकेने पूर्ण केल्या आहेत. ज्या योजनेत गुंतवणूक करायची आहे, त्या योजनेची सर्व माहिती गुंतवणूकदारांना देण्यात येईल. महापालिकेची आर्थिक क्षमता, कर्जांच्या परतफेडीची हमी यांबाबत सेबी व अन्य वित्तीय संस्थांनी दिलेल्या मानांकनाबाबतही त्यांना माहिती मिळेल. ती सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मुंबई शेअरबाजारात येत्या दोन दिवसांत काही गुंतवणूकदारांसमोर या योजनेचे सादरीकरण करण्यात येईल. मर्यादित गुंतवणूकदार असलेल्या गटासाठी महापालिका हे कर्जरोखे काढणार आहे. साधारण २०० गुंतवणूकदार असतील. त्यांना माहिती दिल्यानंतर ती सर्व गुंतवणुकदारांपर्यंत जाईल. त्यानंतर साधारण २२ जूनला मुंबई शेअरबाजारात महापालिकेच्या कर्जरोख्यांची घोषणा करण्यात येईल. जे सर्वाधिक कमी व्याजदराने गुंतवणूक करण्यास तयार असतील त्यांना संधी मिळेल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
एकाच वेळी २०० कोटी गुंतवणूक करणारेही असतील किंवा एकापेक्षा जास्त गुंतवणूकदारही असतील. कर्जरोखे काढल्यास त्याच्या व्याजदरात २ टक्के अनुदान देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेचा फायदाच होणार आहे. कर्जरोखे उभारणीसाठी लागणारी सर्व कायदेशीर तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे. स्वतंत्र खाते सुरू करून त्यात दर वर्षीचे परतफेड व मुदलाचे पैसे जमा केले जातील. त्यासाठी मिळकत कर व पाणीपट्टी यांच्या जमा रकमेचे स्वतंत्र खाते सुरू करण्यात येणार आहे.

शहराच्या पाणीवापरात होणार बचत
जसे मीटर बसतील तशी वसुली केली जाईल. सुरुवातीला व्यावसायिक वापराच्या नळजोडांना मीटर बसवले जाणार आहेत. २४ तास पाणी योजनेनंतर पुणे शहराच्या पाणीवापरात निश्चितपणे बचत होईल. पैशांअभावी योजना अपुऱ्या राहतात; मात्र आता कर्जरोख्यांच्या माध्यमातून पैसे उभे राहणार असल्यामुळे ही योजना १०० टक्के पूर्ण होणार आहे, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

सुरुवातीला व्यावसायिक वापरासाठी असलेल्या नळजोडांवर मीटर बसवले जाणार आहेत. त्यानंतर औद्योगिक व घरगुती वापरासाठी मीटर बसविले जाणार आहेत. मीटर बसवले जातील त्याप्रमाणे वसुली सुरू होईल. हे सर्व मीटर अत्याधुनिक असून त्यांना सेन्सर बसवलेले आहेत. त्यात कोणी फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची माहिती त्वरित मुख्य कार्यालयाला मिळेल व त्याची दखल घेतली जाईल.

पूर्वतयारीमुळे योजना विनाहरकत मार्गी
योजनेची पूर्वतयारी करणे क्लिष्ट होते. त्यामुळे सुरुवातीला त्याबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या. माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नव्हती. मात्र, मोठ्या प्रकल्पांमध्ये हे स्वाभाविक असते. योजना तयार करताना कुठेही त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळेच वित्तीय संस्थांपासून ते राज्य सरकारपर्यंत कुठेही या योजनेला कसली हरकत घेण्यात आली नाही, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: The 'share of debt' will be in the stock exchange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.