शेअर रिक्षा फायद्याचीच; अडथळे दूर होण्याची गरज : रिक्षा संघटनांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:37 AM2019-07-19T11:37:01+5:302019-07-19T11:37:26+5:30
शेअर रिक्षा हा चांगला प्रकार आहे. सन २००९ मध्ये तो सुरू करण्यात आला होता...
पुणे: एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रवाशांनी एकच रिक्षा केली तर ते त्यांच्या व पयार्याने आमच्याही फायद्याचेच आहे, मात्र यात कायदेशीर व बेकायदेशीर अशा अनेक अडचणी असून त्या सोडवल्या तर पुण्यातील रस्त्यांवरची खासगी वाहनसंख्या काहीअंशी तरी कमी करण्यासाठी शेअर रिक्षा हा पर्याय चांगला असल्याचे मत लोकमत च्या व्यासपीठावर शहरातील प्रमुख रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.
शहरात नित्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी '' लोकमत'' ने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मोहिमेत गुरूवारी दुपारी शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधण्यात आला. मागील आठवड्यात काही वाहतूक तज्ज्ञ तसेच वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल या विषयावरील चर्चासत्रात शेअर रिक्षाचा एक पर्याय सुचवण्यात आला होता. त्यामुळे त्याच विषयावर आयोजित या चर्चेत सर्वच प्रतिनिधींनी शेअर रिक्षाच्या बाजूने मत व्यक्त केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे यांच्यासह रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार, आम आदमी रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे राजेंद्र भावे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर,आबा बाबर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक जगदीश कांदे, पुणे शहर वाहतूक सेवा संघटनेचे संजय कवडे, स्वारगेट ऑटो रिक्षा संघटनेचे हेमंत जाधव, ट्रेटा कल्पक ट्रान्सपोर्ट चे राहूल शितोळे, रिक्षाचालक तुषार पवार, बापू कांबळे, चर्चेत सहभागी झाले होते.
शेअर रिक्षा हा चांगला प्रकार आहे. सन २००९ मध्ये तो सुरू करण्यात आला होता. त्यावेळी सर्व स्थानके ते प्रमुख रस्ते, व प्रमुख रस्त्यांवरून सर्व स्थानके अशा मोजक्याच मार्गांची निवड केली होती. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला, मात्र त्यात नंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या. मुख्य म्हणजे प्रशासन व पोलिस यांचे अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. शेअर रिक्षांना स्वतंत्र थांबे हवेत, तिथे अन्य कोणती खासगी वाहने यायला नकोत, किमान एक पोलिस उपस्थित असणे अशा काही गोष्टींची गरज होती, मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही अशी तक्रार करण्यात आली. ही पद्दत पुन्हा सुरू झाली तर त्याचा प्रवासी व रिक्षाचालक अशा दोघांनाही व शहरालाही चांगला फायदा होईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
बहुसंख्य वक्त्यांनी शहरातील वाढती वाहतूक, त्यामुळे रिक्षा चालवताना होणारी अडचण याबद्दल सांगितले. आम्हीही याच व्यवस्थेचा भाग असल्यामुळे आम्हाला यातून सूटका हवी आहे, मात्र त्याचा विचार कोणी करत नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. लोकमत च्या व्यासपीठावरून या विषयावर बोलता येत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.