ॲपवर ‘शेअर’ ट्रेडिंगचा नफा दिसला; पैसे काढता येईना, ६.५ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: March 23, 2024 03:50 PM2024-03-23T15:50:14+5:302024-03-23T15:51:29+5:30
या प्रकरणी शुक्रवारी (दि. २२) कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे...
पुणे : आयपीओमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि. २२) कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत आसिफ हातिम रंगोली (वय- ४७, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२३ ते २२ मार्च २०२४ यादरम्यान घडली आहे. फिर्यादी यांना सायबर चोरट्याने मोमेंटम स्टोक कम्युनिटी नावाच्या एका व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये दररोज आयपीओविषयी माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे भासवले जात होते. काही दिवसांनंतर अधिकृत एजंट बोलत असल्याचे सांगून गुंतवणुकीचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादींना ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाउनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी ६ लाख ८९ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
यानंतर त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र, फिर्यादी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरण्यासाठी तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर त्यांनी कोंढवा पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील हे करत आहेत.