शेअरिंग सायकलींची होतेय चोरी : पोलीस आयुक्तांसह महापालिकेला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 08:44 PM2018-09-10T20:44:11+5:302018-09-10T20:44:53+5:30
गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारी किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत.
पुणे: पुणेकरांच्या सोयीसाठी विविध खाजगी कंपन्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात पब्लिक बायसिकल शेअरिंग योजने अतंर्गत शहराच्या विविध भागात सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारीत किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत. या वाढत्या प्रकारामुळे कंपन्या हैराण झाल्या असून याबाबत पोलीस व महापालिका आयुक्तांनी सहकार्य करावे असे लेखी पत्र देण्यात आले आहे.
पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गेल्या काही दिवसांत संबंधित खाजगी कंपन्यांकडून सायकलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या सायकलींची मोडतोड करणे,त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारीत किंवा अन्यत्र फेकुन देणे या प्रकाराबरोबरच या सायकली चोरुन त्यांचे लॉक तोडून त्या एखाद्या वस्तीत नेऊन ठेवणे व तेथील लहान मुलांनी त्याचा बिनदिक्कत वापर करणे असे प्रकार घडत आहे.
क्रिएटिव्ह फौडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच आपल्या भागातील एका वस्तीत कार्यकर्त्यांच्या मदतीने पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेतील तब्बल सात सायकली ताब्यात घेतल्या. माणुसकीच्या दृष्टीकोनातून याबाबत एफआयआर दाखल केली नाही. परंतु हे प्रकार वाढले आहेत.