अंडरवर्ल्डमधील शार्प शूटर ते मुक्तांगणचा व्यसनमुक्त कार्यकर्ता ; एक थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:38 PM2019-03-18T17:38:47+5:302019-03-18T17:40:49+5:30
एकेकाळी अंडरवर्ल्डमधील शार्प शूटर ते मुक्तांगणचा व्यसनमुक्त कार्यकर्ता असणाऱ्या राहुल जाधव यांचा थक्क करणारा प्रवास.
पुणे: एकेकाळी मी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून कुप्रसिद्ध होतो. आर्थररोड कारागृहात शिक्षा भोगून आल्यानंतर एक
व्यसनाधीन, वाया गेलेला तरूण म्हणून माझ्याकडे बोट दाखवले जायचे. पण पुण्यातील मुक्तांगणच्या वास्तव्यामुळे मी व्यसनापासून मुक्त झालो. यामुळे जगण्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील शार्प शूटरपेक्षा मुक्तांगणचा व्यसनमुक्त कार्यकर्ता ही ओळख मला आता जास्त आवडू लागली आहे, असे सांगताना राहुल जाधव यांच्यासह उपस्थितांनाही गहिवरून आले. वाल्याच्या वाल्मिकी होतानाच्या त्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे अनेक जण साक्षीदार ठरले.
निमित्त होते, मुक्तांगण मित्रतर्फे आयोजित मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते दिल्लीच्या इंडिया गेटपर्यंतची मॅरेथॉन यशस्वीपणे पार करणा-या राहुल जाधव यांचा विशेष सत्कार आणि प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे. मुक्तांगणमध्ये राहून व्यसनमुक्त झालेल्या राहुल जाधव यांनी गुन्हेगारी जगताची वाट सोडून आपल्या आयुष्याला सकारात्मकतेची जोड दिली. एक यशस्वी मॅरेथॉन रनर म्हणून राहुल जाधव सुपरिचीत आहेत. यावेळी ज्येष्ठ मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी राहुल जाधव यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोर्डे फूडसचे संचालक हर्षल मोर्डे, मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि मोर्डे फूडस यांच्या वतीने मुंबई-दिल्ली दी अँडिक्शन अल्ट्रा मॅरेथॉन 2019 चे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते दिल्लीच्या इंडिया गेटपर्यंतचे सुमारे 1475 किलो मीटरचे अंतर मी 20 दिवसांच्या कालावधीत पार केले. दिवसाला सरासरी 80 किलो मीटर अंतर पार करताना मनात एकच जिद्द होती, ती म्हणजे आपल्या माध्यमातून इतर व्यसनाधीन व्यक्तींना सकारात्मक संदेश देण्याची. त्याविषयी सांगताना राहुल जाधव म्हणाले , मुक्तांगणसाठी काम करताना, मॅरेथॉनमध्ये धावताना, व्यसनाधीन लोकांशी बोलून त्यांचे मन वळविताना मला खूप समाधान मिळते. आपल्याला मिळालेले अनमोल जीवन व्यसने किंवा गुन्हेगारीमुळे व्यर्थ वाया जाते, हे मी स्वत: अनुभवले आहे. त्यामुळे या वाटेवर असणा-या प्रत्येकाला जीवनाची खरी वाट दाखविणा-या मुक्तांगणसारख्या संस्था मला खूप महत्त्वाच्या
वाटतात.
गुन्हेगारी जगतातून मुक्त होण्याच्या मार्गाविषयी बोलताना राहुल जाधव म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय होता. मला ज्या वातावरणात राहण्याची, तिथली भाषा बोलण्याची, शस्त्राच्या माध्यमातून व्यक्त होण्याची सवय लागली होती. त्या सगळ्या सवयींना मुरड घालणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात येताना आजुबाजूच्या लोकांना तोंड देणे, परिस्थितीशी मिळते-जुळते घेणे या सगळ्या गोष्टी करणे निश्चितच खूप सोपे नव्हते. या माझ्या सगळ्या सवयी सकारात्मक सवयींमध्ये बदलण्यासाठी समुपदेशनाचा खूप उपयोग झाला. धावणे हा क्रीडा प्रकार मला आवडत असल्याने मी त्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे माझ्याशरीर आणि मनाला देखील
चांगला व्यायाम मिळाला.