देऊरच्या पाण्यासाठी शशिकांत शिंदे आक्रमक

By admin | Published: November 22, 2015 10:42 PM2015-11-22T22:42:22+5:302015-11-23T00:32:10+5:30

आढावा बैठक : शासकीय अधिकाऱ्यांना केल्या सूचना; गावाच्या विकासात सहभागाचेही आवाहन

Shashikant Shinde aggressive for the water of the offering | देऊरच्या पाण्यासाठी शशिकांत शिंदे आक्रमक

देऊरच्या पाण्यासाठी शशिकांत शिंदे आक्रमक

Next

वाठार स्टेशन : ‘राज्य शासनाच्या ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेत शासन आदेशाप्रमाणे सुरुवातीच्या पहिल्या वर्षात एकाच गावाची निवड करावी, अशी सूचना मिळाल्यानंतर मी देऊरला प्राधान्य दिले आहे. तीन वर्षांच्या कालावधीत सर्व विभागांनी विकासात्मक प्रारूप आराखडा तत्काळ तयार करावा. सुरुवातीला बिकट बनलेल्या पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊन तात्पुरती पाणी योजना तयार करावी. आठ दिवसांत वसनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडणार असल्याची भूमिका आहे. देऊरचा सर्वप्रथम टंचाईमध्ये समावेश करावा व गावच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हावे,’ अशा सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील आयोजित शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मुंबईतील उद्योगपती जे. के. साबू, कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, सहायक गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, सरपंच नीलिमा कदम, उपसरपंच बाळकृष्ण कदम, मुधाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संजीव कदम, विश्वस्त धनसिंग कदम, किसनराव कदम, सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेबाबत कोरेगावच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेत ग्रामस्थ, महिला, युवकांनी संघटितपणे सहभाग घेऊन गावाबाबतच्या समस्या ग्रामसभेत मांडून तसे ठराव द्यावेत, अशा सूचना केल्या.
देऊर गावातील समस्या मांडताना किसन वीर कारखान्याचे माजी संचालक किसनराव कदम यांनी सर्वप्रथम गावच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका घेत वसना नदीत नवीन विहीर खोदण्याबाबत लक्ष वेधले. यासाठी अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करावी. या विहिरींसाठी निधी उपलब्ध झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात या विहिरींतील पाणी सध्या असलेल्या गावच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी शेजारील बंधाऱ्यात साठवण करता येईल, अशी सूचना मांडली.
अ‍ॅड. संजीव कदम यांनी वसना योजनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडल्यास सायपन पद्धतीने या योजनेतील पाण्यातून असणारे छोटे तलाव भरतील. परिणामी वसना नदीतील सध्या असलेल्या उपसा विहिरीतून पाणी साठवण करता येईल, अशी भूमिका मांडली
आमदार शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्पुरती पाणी योजना व कायमस्वरूपी पाणी योजना तसेच देऊर व वाठार स्टेशन अशी एकत्रित पाणी योजना करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या.
देऊर येथील मुधाई देवस्थानास पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळवून देणे. बंद असलेले शासकीय विश्रामग्रह दुरुस्ती करून ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरस्तीसाठी देणे, अंतर्गत सर्व रस्ते तसेच गावाला जोडणारे भांडेवाडी, बिचुकले, असनगाव, दहिगाव या रस्त्यांबाबत निधी उपलब्ध करणे, अशा विकासात्मक कामांना नजीकच्या काळात सुरुवात करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
देऊर ग्रामस्थांनीही या कामात एकजुटीने शासनाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून गावच्या विकासाला सहकार्याची भूमिका घेतली. (वार्ताहर)

देऊर राज्यात रोलमॉडेल ठरेल
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, अशी एक सूचना केली होती. त्या सूचनेचा गावाने आदर करीत निवडणूक बिनविरोध करण्याचा इतिहास घडविला. त्या गावाचा विकासात्मक इतिहास घडवण्यासाठी ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उभारून देऊर हे गाव राज्यात रोल मॉडेल बनवण्याचा निर्धार कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. देऊर येथे ‘आमदार आदर्श ग्राम’ म्हणून निवड केल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा गावच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी हा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Shashikant Shinde aggressive for the water of the offering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.