कोरेगाव भीमा येथील शौर्य दिन यंदा दोन दिवस, समन्वय समितीकडून घोषणा; सुविधा पुरविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:49 AM2023-11-09T07:49:06+5:302023-11-09T07:49:36+5:30
दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभाचा विकास करण्याबाबतची घोषणा करण्यात आली होती.
पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य दिनाचा सोहळा यंदा ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाख अनुयायी येतील, असा अंदाज असून, त्यासाठी सरकार पातळीवर देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा दोन दिवस पुरवण्यात याव्यात, अशी मागणी कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभाचा विकास करण्याबाबतची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप कार्यवाही झाली नसून सरकारकडून न्यायालयीन वाद असल्याचे खोटे सांगितले जात असल्याचाही आरोप समितीने केला आहे. शौर्य दिनाच्या तयारीसंदर्भात समन्वय समितीने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षी शौर्य दिनाला १६ लाख अनुयायी आले होते. यंदा २० लाख अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरून सोयीसुविधा देण्याचे नियोजन समन्वय समिती तसेच जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित बैठकीत करण्यात आले आहे.