‘ती’ स्वीकारते ‘नकोशा’ झालेल्या देवतांचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:50+5:302021-02-10T04:11:50+5:30
पुणे : घराला नवा ‘लूक’ देताना देवघरांच्या संकल्पनाही बदलल्या. ‘मॉडर्न इंटेरियर’मध्ये देवतांच्या तसबिरी ‘सूट’ होईनात. मग, झाडांखाली, उकिरड्यावर, नाले ...
पुणे : घराला नवा ‘लूक’ देताना देवघरांच्या संकल्पनाही बदलल्या. ‘मॉडर्न इंटेरियर’मध्ये देवतांच्या तसबिरी ‘सूट’ होईनात. मग, झाडांखाली, उकिरड्यावर, नाले आणि नद्यांच्या पात्रांमध्ये त्या भिरकावल्या जाऊ लागल्या. ज्यांच्याकडे स्वप्ने पूर्ण करण्याच्या मनोकामना मागितल्या त्याच ‘नकोशा’ झालेल्या देवतांचा स्विकार करण्याची अनोखी चळवळ राज्यात उभी राहात आहे. या चळवळीतून आतापर्यंत जवळपास ८०० लोकांनी त्यांच्या घरातील नको असलेल्या तसबिरी आणि मूर्त्या दान केल्या आहेत.
पेशाने वकील असलेल्या अॅड. तृप्ती गायकवाड या तरुणीच्या संकल्पनेतून याची सुरुवात झाली. मुळच्या नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या रहिवासी असलेल्या तृप्ती घरची देवपुजा आणि सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य करतात. देवतांची ही विटंबना थांबविण्याबाबत ‘मेसेज’ तयार करुन मित्र-मैत्रिणींना पाठविला. लोकांकडून टाकाऊ वाटणाऱ्या तसबीरी, मूर्त्या स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यांचा ‘मेसेज’ सोशल मिडीयात व्हायरल झाला. अल्पावधीतच पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, औरंगाबादेतून प्रतिसाद मिळू लागला. या कामात इच्छूक असलेल्यांचा गट तयार झाला. विविध शहरातून जोडल्या गेलेल्यांची ‘टीम’ तयार झाली. फेसबुकवर ‘संपूर्णम’ नावाने पेज तयार करण्यात आले.
येवल्यातच ‘रिसायकलींग’चे काम सुरु करण्यात आले. तसबिरी-मुर्त्यांची उत्तरपुजा करुन त्याचे कागद, प्लास्टिक, लाकूड, लोखंड, पत्रा, प्लास्टर ऑफ पॅरिस असे वर्गीकरण केले जाऊ लागले. कागदाचा लगदा बनविणे, धातू आणि प्लास्टिक वितळवून त्याचे ब्लॉक तयार करणे, प्लास्टर ऑफ पॅरिसचा भुगा करुन त्यापासून वस्तू बनविण्याचे काम सुरु करण्यात आले. काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. परंतु, त्यांना महत्व पटवून देण्यात आले.
=====
दुसऱ्याची पिडा आपल्या घरात कशाला आणतेस, असे सुरुवातीला म्हणणारी आईदेखील या कामात सहभागी झाली. तृप्ती यांच्या होणाऱ्या पतीनेही या कामात सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे.
====
नाशिक-मुंबई-पुण्यामधून हे साहित्य गोळा करण्याची यंत्रणा ठरली आहे. एक गाडी त्यासाठी पाठविली जाते. ठरविलेल्या केंद्रावर लोक साहित्य आणून देतात. या केंद्रांवरुन हे साहित्य एकत्र केले जाते.