दैवाचा असाही खेळ ! स्वीडनवरुन आली आईच्या शाेधात भेटली बहिणीला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 02:57 PM2019-05-30T14:57:31+5:302019-05-30T15:15:20+5:30
32 वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या बहिणींची पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेमुळे भेट हाेऊ शकली आहे.
पुणे : अनेक सिनेमांमध्ये लहानपणी हरवलेली भावंड माेठेपणी सापडल्याचे अनेक कहाण्या आपण पाहिल्या आहेत. अशा कहाण्या नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेत आल्या आहेत. अशीच काहिशी कहाणी पुण्यात समाेर आली आहे. 32 वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या बहिणींची कायाकल्प संस्थेच्या मदतीने भेट झाली आहे. मात्र नियतीचा खेळ असा की एक स्वीडनमध्ये सुखवस्तू आयुष्य जगत आहे तरी दुसरीला जगण्यासाठी पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करावा लागत आहे.
महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यातून एक महिला कामानिमित्त पुण्यात आली हाेती. काही कारणास्तव ती वेश्याव्यवसायात ओढली गेली. 32 वर्षापूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. परिस्थिती हालाखीची असल्याने मुलीचा सांभाळ करणे महिलेला शक्य नव्हते. तिने मुलीला एका सामाजिक संस्थेकडे साेपवले. संस्थेने मुलीला एका स्वीडनमधील दापत्याला दत्तक दिले. दत्तक देताना काही कागदपत्रे देखील त्या संस्थेने त्या दापत्याला दिली.
ती मुुलगी लहानाची माेठी स्वीडनमध्ये झाली. तिचं लग्नही झालं. नेहा असं तिचं नाव. स्वीडनमध्ये तिचं नाव हाेलनग्राम असे ठेवण्यात आले. नेहाचं काेणी नातेवाईक भारतात आहे का याचा शाेध तिच्या पतीला घ्यायचा हाेता. त्यासाठी नेहाने पुण्यातील कायाकल्प संस्थेशी संपर्क केला. तिने तिच्याकडे असलेली कागदपत्रे संस्थेला पाठवली. त्याच्या आधारे संस्थेने तिच्या आईचा शाेध घेण्यास सुरुवात केली. यात तिच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याचे समाेर आले. या दरम्यान कायकल्प संस्थेकडून एका मुलीच्या नातेवाईंकाच शाेध घेतला जात असल्याचे नेहाच्या बहिणीला कळाले. तिच्या आई - वडिलांचे नाव त्या कागदपत्रांमध्ये असल्याचे समजताच तिने कायकल्प संस्थेशी संंपर्क केला. त्यानंतर तिची खात्री झाल्यानंतर आपण नेहाची बहिण असल्याचे तिने सांगितले. त्यानंंतर संस्थेच्या माध्यामातून नेहाला याची माहिती देण्यात आली. बहिणीला भेटण्यासाठी नेहा स्वीडनहून पुण्यात दाखल झाली. दाेघींची भेट हाेताच दाेघींच्या डाेळ्यात अश्रू आले. दाेघींची भेट घडवून आणण्यात कायाकल्प संस्थेच्या विश्वस्त सीमा वाघमाेडे आणि सारिका लष्करे यांचा माेलाचा वाटा आहे.
याबाबत सीमा वाघमाेडे म्हणाल्या, नाेव्हेंबर 2018 ला नेहाचा माझ्याशी संपर्क झाला. तेव्हापासून आम्ही तिच्या आईचा शाेध घेत हाेताे. गेल्या 10 वर्षापासून नेहा तिच्या आईचा शाेध घेत हाेती. या दरम्यान तिची आई हयात नसल्याचे समाेर आले. परंतु तिची माेठी बहिणी संस्थेला सापडली. याबाबत नेहाला माहिती देण्यात आली. त्यानंतर नेहा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पुण्यात आली.
दरम्यान, या दाेघी खरंच एकमेकींच्या बहिणी आहेत का हे डीएनए चाचणी केल्यानंतरच स्पष्ट हाेऊ शकणार आहे. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे काम सध्य सुरु आहे.