‘तिने’ मित्रालाही सांगितला नव्हता ‘हा’ प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:06+5:302021-09-08T04:16:06+5:30
पुणे : मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकांसह एकूण १३ जणांनी १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणातल्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत ...
पुणे : मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकांसह एकूण १३ जणांनी १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणातल्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या मुलीवर सतत दोन दिवस अत्याचार झाल्यानंतरही तिने ही बाब मुंबई ते चंदीगड दरम्यानच्या रेल्वे प्रवासात तिच्याबरोबर असलेल्या मित्रालाही दिली नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याचवेळी या १३ नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार करताना अनैसर्गिक संभोगही केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला पैसे देऊन मुंबईला पाठविले. २ सप्टेंबरला दादरला तिने आपला मोबाईल बंद केला. पोलीस तातडीने मुंबईला गेले. परंतु, तोपर्यंत ती तेथून निघून गेली होती. तिने मित्राला दादरला बोलावून घेतले व ते रेल्वेने चंदीगडकडे गेले.
दरम्यान, तिने ज्यांना कॉल केले त्यांचा पाठपुरावा पोलिसांनी सुरू केला. त्यात तिच्या मित्राचा नंबर पोलिसांना मिळाला. पोलिसांनी त्या मोबाईलचे विश्लेषण केल्यावर त्यांना ते रेल्वेने प्रवास करीत असल्याचे दिसून आले. दिल्लीच्या पुढे रेल्वे गेल्याचे लक्षात आल्यावर चंदीगड पोलिसांना पुणे पोलिसांनी तातडीने कळविले व या दोघांची माहिती दिली. चंदीगड पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याबरोबर पुणे पोलीस विमानाने चंदीगडला गेले व त्यांनी दोघांना घेऊन पुण्यात आले. घाबरलेल्या या मुलीला पोलिसांनी धीर देऊन तिच्याकडून सर्व माहिती घेतल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला.
चौकट
रेल्वे प्रवासादरम्यान पीडित मुलीला त्रास होत होता. तिच्या मित्राने तिला विचारल्यावर तिने पोटात दुखतंय असे सांगितले. पण कशामुळे हे काहीही सांगितले नव्हते. मित्राने तिला फूस लावल्याने ती घराबाहेर पडली. त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याने मित्रालाही पोलिसांनी आरोपी करून अटक केली आहे.