'भावाला राखी बांधण्याआधीच तिला मृत्यूनं गाठलं...' कुटुंब वाचलं पण संस्कृती बुडाली...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:27 PM2023-08-31T14:27:52+5:302023-08-31T14:28:18+5:30
पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणारे कुटुंब हे रक्षाबंधनासाठी मूळ गावी पानशेत या ठिकाणी निघाले होते
पुणे : रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली. धावत्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि चार चाकी गाडी थेट खडकवासला धरणात कोसळली. या दुर्घटनेत सोळा वर्षीय तरुणीचा धरणात बुडून मृत्यू झाला. मात्र या गाडीतील तिच्याच कुटुंबातील तिघांना वाचवण्यात यश आले. पुणे जिल्ह्यातील पुणे पानशेत रस्त्यावर बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली..
संस्कृती प्रदीप पवार असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधनासाठी कुटुंबीयांसह मूळ गावी पानशेत या ठिकाणी चार चाकी वाहनाने निघाले होते. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीचे टायर फुटले आणि चालक प्रदीप पवार यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ही गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन थेट धरणाच्या पाण्यात कोसळली.
दरम्यान वर्दळीची वेळ असल्याने रस्त्याने वाहनांची येजा सुरू होती. त्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. कार पाण्यात वाहून गेल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. गाडीतील तीन ते चार जणांना त्यांनी बाहेरही काढलं. मात्र संस्कृती गाडीतच अडकून पडली होती. त्यानंतर रात्री उशिरा तिला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारानंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेनंतर पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.