Pune : ‘ती’ने आत्महत्या केली अन् भावी पतीनेही संपविले जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:51 PM2023-03-18T12:51:03+5:302023-03-18T12:52:58+5:30
भावी पतीनेही पिंपरीतील खराळवाडी भागात आत्महत्या करून जीवन संपविले...
पुणे : येरवड्यातील कल्याणीनगर भागात एका युवतीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूच्या धक्क्याने तिच्या भावी पतीनेही पिंपरीतील खराळवाडी भागात आत्महत्या करून जीवन संपविले. पुढच्याच महिन्यात दोघांचे लग्न होणार होते.
दरम्यान, तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अस्मिता परशुराम धोत्रे (रा. खराळवाडी, पिंपंरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. येरवड्यातील कल्याणीनगर भागात अस्मिताने एका इमारतीतून उडी मारून १४ मार्च रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद केली होती.
तरुणीच्या नातेवाइकांनी मृतदेह येरवडा पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर पोलिसांनी अस्मिता हिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या जाॅनी कुरियन, राजेश कांबळे, जनक शाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत अस्मिताच्या आईने (वय ४५) येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि अस्मिता यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता. आरोपींनी पैशांचा तगादा लावल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे धोत्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
अस्मिता ही पिंपरीतील खराळवाडी भागात राहायला आहे. तिचे लग्न एका तरुणाशी ठरले होते. १४ मार्च रोजी अस्मिता कल्याणीनगर भागात मित्रांना भेटायला आली होती. त्यानंतर तिने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे भावी पतीनेही पिंपरीतील खराळवाडी भागात आत्महत्या केली, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली.