स्वतःची जमीन पाण्याखाली असताना त्या झाल्या 65 कुटुंबाच्या पाेशिंद्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 09:23 PM2019-08-11T21:23:59+5:302019-08-11T21:25:11+5:30
दाेन एकर शेती पुराच्या पाण्यात गेलेली असताना त्या ६५ कुटुंबाच्या पोशिंद्या बनल्या आहेत. यशोदा बाळासो भोळे असे त्या आजींचे नाव आहे.
पुणे : केवळ दोन एकर शेती असणाऱ्या आजीबाई ६५ कुटुंबाच्या पोशिंद्या बनल्या आहेत. त्या गेल्या तीन दिवसांपासून शेकडो पूरग्रस्तांना जेवण बनवून देत आहेत. त्यामुळे आजींची मायाच जणू या पूरग्रस्तांसाठी आधारवड बनली आहे. यशोदा बाळासो भोळे असे त्या आजींचे नाव आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात माळवाडी गाव आहे. त्या ठिकाणी पुराने सर्व कुटुंबांचा आसरा उद्ध्वस्त केला आहे. त्यामध्ये या आजीबाईचा आधार पूरग्रस्तांना मिळत आहे. स्वत:ची जमीन देखील पाण्याखाली असताना न डगमगता त्या सढळ हाताने भाकरी बनवून शेकडो जणांचे पोट भरत आहेत. पलूस येथील डॉ. साधना पवार यांना या आजीबाईंची माहिती समजताच त्यांनी भेट घेऊन त्यांना मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या आजीबाईंची प्रेरणादायी कहाणी सर्वांसमोर आणली आहे. आजीबाईंसोबत त्यांचा मुलगा राजाराम भोळे, सून देखील पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.
एकीकडे पुरामुळे सर्व उद्ध्वस्त झालेले असताना या आजीबाईंमुळे जीवन जगण्याची प्रेरणा मिळत आहे. स्वत:च्या घरात काहीही नसताना त्यांची नि:स्वार्थपणे सेवा देण्याची इच्छा मनाला उभारी देणारी आहे. या मायमाऊलीला खूप खूप सलाम, अशा भावना डॉ. साधना अमोल पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.