‘ती’ विहीरच कचऱ्याच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:59 PM2018-10-03T23:59:41+5:302018-10-04T00:00:08+5:30
नगरपरिषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह : पाहणीत उघडकीस आले वास्तव
बारामती : नगरपालिका प्रशासन जळोची हद्दीतील गालिंदे यांच्या ज्या विहिरीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणार असल्याचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी सांगितले, ती विहीरच कचºयाच्या विळख्यात व प्रचंड दुर्गंधी असलेल्या परिसरात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींचे बारामती येथील नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येते. यावर उपाय म्हणून बारामती नगरपालिकेने विसर्जन कुंड तयार करून या कुंडामध्येच गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती शहरातील अनेक नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये मूर्तींचे विसर्जन केले. मात्र, कुंडामध्ये जमा झालेल्या या मूर्ती योग्य पद्धतीने विसर्जन करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर होती. पण, नगरपालिका प्रशासनाने या मूर्ती कचरा डेपोमध्ये नेल्या. या वेळी भाजपाचे पदाधिकारी व काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती भरलेल्या कचºयाच्या गाड्या अडविल्या. गणेशमूर्ती कचरा डेपोत आणलेल्या पाहिल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
यावर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी मंगळवारी (दि. २) पत्रकार परिषद घेतली, यामध्ये आरोप
फेटाळत मुख्याधिकारी म्हणाले, सालाबादप्रमाणे जळोची येथील गालिंदे यांच्या वापरात नसलेल्या विहिरीमध्ये गालिंदे यांच्या परवानगीने गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे नियोजन केले होते, असे सांगितले. बारामती येथील माळावरच्या देवी परिसरात असलेल्या कचरा डेपो परिसरात ‘लोकमत’ने प्रत्यक्ष
पाहणी केली. यावेळी गालिंदे यांच्या वापरात नसलेल्या ज्या विहिरीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले होते. ती विहीरच कचºयाच्या विळख्यात आहे. या विहिरीचे पाणीदेखील काळे व शेवाळयुक्त आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी
विहिरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. त्यामुळे या विहिरीत जरी गणेशमूर्ती विसर्जन केल्या तरी त्यांचे पावित्र्यही धोक्यात येणार आहे.
नगरपालिकेकडून गालिंदे यांच्या विहिरीचा हवाला देऊन सारवासारव करण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेने विसर्जन कुंडामध्ये जमा झालेल्या गणेश मूर्तींच्या पावित्र्याला कोणताही धक्का न लागता विसर्जन करण्याची अपेक्षा होती.
ज्या विहिरीमध्ये विसर्जन करण्याचे नियोजन करण्याचा घाट घातला गेला ती विहिरच जर कचºयाच्या आणि प्रचंड दुर्गंधीयुक्त ढिगाºयामध्ये असेल तर नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होऊ लागला आहे.